‘चला छत्रपती शिवाजी महाराज समजून घेऊया’ व्याख्यान
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापन केले नाही तर त्यांनी समाज घडवण्यासाठी प्रेरणा ही दिली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ तसेच तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे सारखे मावळे मिळाले. सवंगड्यांची साथ व राष्ट्रमातेची प्रेरणा ही जीवनात धैर्य व सारथ्य देणारी ठरली. त्यामुळेच महाराज घडले. या प्रेरणेतूनच शिवराय घडले. आयुष्यात कधी संकट आले किंवा नैराश्य आले तर रायगडाला भेट द्या. रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला संकटातून बाहेर पडण्याची नवी प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन शिवव्याख्याते डॉ. विनोद बाबर यांनी केले आहे.
गुंफण साहित्य संमेलनाच्या पाचव्या सत्रात डॉ. विनोद बाबर यांचे ‘चला छत्रपती शिवाजी महाराज समजून घेऊया’ या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी डॉ. विनोद बाबर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आजच्या पिढीसाठी महत्त्वाचे आहेत. जगात अनेक राजे होऊन गेले. मात्र, साडेतीनशे वर्षांनंतरही शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यामुळे राजांचे विचार घेऊन आपण पुढे जाणे गरजेचे असून, अपयश आल्यानंतर अनेक जण खचून जातात. परंतु, पुरंदरचा तह झाल्यानंतर देखील राजे मागे हटले नाहीत. त्यांनी पुन्हा जोमाने स्वराज्य निर्माण करण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे आपणही खचून न जाता यशस्वी होण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे. अफझलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्वस्थ बसले. त्यानंतर राजांनी १८ दिवसांत१७ किल्ले जिंकले. सातत्याने यशस्वी होण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत. शत्रूचा देखील शिवाजी महाराजांवर विश्वास होता.
आजकाल आपला वेळ मोबाईल पाहण्यात जात आहे. त्यामुळे आपल्यातील संवाद कमी झाला आहे. मात्र, प्रत्येकानेच मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. आयुष्यात काहीच करू शकत नाही, असे वाटत असल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना भेट द्या. जगाचे स्टेटस बघण्यात वेळ घालविण्यापेक्षा स्वतःकडे अधिक लक्ष द्या, शिवाय जीवनात चांगला मित्र जपा, मोबाईल पासून दूर राहा, असे मत त्यांनी व्यक्त केले.