Screenshot_20231215_204704
  • बेळगाव: आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी अंगणवाडी भरतीत सुरू असलेल्या कन्नड सक्तीचा मुद्दा उपस्थित करत सरकारने उमेदवारांना घातलेली कन्नड प्रथम भाषेची सक्ती मागे घेण्याची मागणी केली. यावेळी तालुक्यातील अन्य समस्यांकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते मराठीतून बोलत असताना आणि त्यांच्या निवेदनाला सभापती यु. टी. खादर यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद दिला जात असताना अचानक अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आमदार हलगेकर यांच्या मराठी बोलण्याला विरोध केला. हलगेकर यांना चांगले कन्नड येते त्यांनी कन्नडमध्येच बोलायला हवे, असा बालिश हट्ट धरला. त्यामुळे सवदी यांचा मराठी द्वेष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यांच्या या भाषा द्वेषाच्या वर्तणुकीवर मात्र मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
  • तालुक्यात 206 मराठी शाळा आहेत. परिणामी या गावांमधील अंगणवाडी शिक्षिका देखील मराठी माध्यमाच्या असणे आवश्यक आहे. असे असताना मराठी अंगणवाडी केंद्रांमध्ये कन्नड अंगणवाडी सेविकांची नेमणूक करणे लहान मुलांवर अन्यायकारक ठरणार आहे. त्याकरिता मराठी गावामध्ये मराठी उमेदवाराचीच अंगणवाडीवर नियुक्ती करावी. अशी योग्य मागणी आमदार हलगेकर यांनी केली. त्यांच्या या मागणीशी अर्थाअर्थी संबंध नसलेल्या आमदार सवदी यांनी केवळ मराठी शब्द कानावर पडल्याने मध्येच नाक खुपसण्याचा प्रकार केला. यावेळी सभापती खादर यांनी आमदार हलगेकर यांना व्यवस्थित कन्नड बोलता येत नसल्याने ते मराठीतून आपली समस्या मांडत असल्याचे सांगून सवदी तुम्ही सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहात कोणत्याही भाषेचा द्वेष करू नका, हलगेकर यांना बोलू द्या असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण सवदी यांनी शेवटपर्यंत हलगेकर यांच्या मराठी बोलण्याला विरोध कायम ठेवला.
  • यावेळी आमदार हलगेकर यांनी सवदी साहेबांनाही चांगले मराठी बोलता येते. ते आमच्या तालुक्यात प्रचाराला येतात तेव्हा मराठीतूनच बोलतात असे सांगून आमच्या तालुक्यातील नागरिक कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाहीत. फक्त आमच्या समस्या सोडवा. असे रोखठोक बोल सुनावले.
  • हुबळी धारवाड शहरांना खानापूर तालुक्यातील पाणी नेण्यासाठी सरकार धडपड करत आहे. पण माझ्या खानापूर तालुक्यातील जनता तहानेने त्रस्त आहे. पाणी योजना नसल्याने शेतकरी संकटात आहे. आदि खानापूरला पाण्याची सोय करा त्याशिवाय तुमची कोणतीही पाणी योजना यशस्वी होणार नाही. असेही आमदार हलगेकर यांनी ठणकावून सांगितले. जंगल भागातील रस्त्यांची कामे वनविभाग आडवीत आहे. दुर्गम भागाला सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तालुक्यात 900 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यामध्ये एकही रस्ता सुस्थितीत नाही. याकडे आमदार हलगेकर यांनी सभापती खादर यांचे लक्षवेधून जलद कृतीची मागणी केली. सभापती यांनी आमदार हलगेकर यांना बेंगलोर येथील जानेवारी महिन्यात होणाऱ्या अधिवेशनाला कन्नड मधून समस्या मांडा. आणि सभागृहाला तुमच्या समस्यांची दखल घ्यायला भाग पाडा. असा सल्ला दिला. तथापि सभागृहात उत्तम कन्नड बोलणारे कितीतरी सदस्य आहेत. ते अस्खलित कन्नड बोलतात म्हणून त्यांच्या मतदारसंघातील सगळ्याच समस्या सुटलेल्या आहेत असे नाही. याचा मात्र सभापतीनाही विसर पडला की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us