राष्ट्रीय:
झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरात ३०० कोटीहून अधिक रोकड सापडली आहे. देशातील कोणत्याही एजन्सीने एकाच गट आणि त्याच्याशी संबंधित संस्थांविरुद्ध केलेल्या कारवाईत जप्त केलेली ही सर्वाधिक रोख रादा रक्कम आहे. ओडिशा आणि झारखंडमधील त्यांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. या छाप्यात प्राप्तिकर अधिकाऱ्यांना ती तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल सापडला. छापेमारीचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये प्रचंड रोख रक्कम दिसत आहे. ही रक्कम बहुतांश ‘काळा पैसा’ स्वरुपातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांविरुद्ध छापे टाकल्यानंतर ६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या कारवाईनंतर प्राप्तिकर विभागाने नोटा मोजण्यासाठी सुमारे १०० हून अधिक मशीन तैनात केल्या आहेत. मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बँकेचे कर्मचारी आणले आहेत. मात्र, ही रक्कम अजूनही मोजून संपली नसल्याचे समजते. शनिवारपर्यंत ही रक्कम तीनशे कोटींपर्यंत पोहोचली होती. याशिवाय जप्त केलेली रोकड राज्य सरकारी बँकांमध्ये पोहोचवण्यासाठी विभागाने आणखी वाहनांची मागणी केली आहे.
या कारवाईचा एक भाग म्हणून धीरज प्रसाद साहू यांच्या अन्य मालमत्तांवरही छापे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच आता प्राप्तिकर अधिकारी कंपनीचे विविध अधिकारी आणि त्यांच्याशी संबंधित इतर व्यक्तींचे जबाब नोंदवत आहेत. प्राप्तिकर अधिकाऱ्यांना दारू वितरक, विक्रेते आणि व्यावसायिक गटांद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध विक्री आणि रोख रकमेची वाहतूक याविषयी गुप्तचर कडून माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या छाप्यात बोलंगीर जिल्ह्यातील कंपनीच्या आवारात ठेवलेल्या सुमारे ८-१० शेल्फमधून २३० कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
यापूर्वी फक्त बँकेच्या कॅशियरनेच इतक्या नोटा पाहिल्या असतील’ : अमित शाह
आज जागतिक भ्रष्टाचारविरोधी दिन आहे. सुदैवाने दोनच दिवसांपूर्वी आम्ही अशी छायाचित्रे पाहिली होती ज्यात एका खासदाराच्या घरात इतकी रोकड सापडली होती. हे पाहून मला आश्चर्य वाटले, आतापर्यंत फक्त बैंक कैशियरने इतक्या नोटा पाहिल्या असतील. अन्य कुणीही आयुष्यात इतक्या नोटा एकत्र पाहिल्या नसतील अशी मला खात्री आहे’, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले