खानापूर/ प्रतिनिधी= खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडे पाच जणांनी विविध नमुन्यात उमेदवारीसाठी इच्छुकता दर्शवली आहे. पाचही मातब्बर उमेदवार आहेत. त्यामुळे कोणाची निवड करावी हा प्रश्न खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड कमिटीसह मुख्य कोअर कमिटीच्या समोरही उपस्थित राहिला आहे . गुरुवारी दुपारी 2 पर्यंत विहित नमुन्यात व निर्धारित शुल्क आकारून अर्ज भरण्यासाठी वेळ देण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात सात जणांनी अर्ज दाखल केले होते. पण त्यापैकी पाच जणांनी इच्छुकता दर्शवली आहे. त्या पाच इच्छुकांची शुक्रवारी अध्यक्षसह कोअर कमिटीच्या बैठकीत मुलाखत घेऊन त्यांची इच्छुकता व निवडणूक संदर्भात काय तयारी आहे, यासंदर्भात चर्चा केली. यावेळी त्या पाच इच्छुक उमेदवारांना आपसात चर्चा करून एकाची निवड करण्यासाठी एकमत दाखवावे असे सूचित करण्यात आले. यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत त्या पाच इच्छुकांना वेळ देण्यात आला आहे. शनिवारी दुपारी बारा वाजता निवड कमिटीची बैठक होणार आहे. शहरासह पंचांग प्रत्येक जिल्हा पंचायत निहाय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची जवळपास 60 जणांची कार्यकारणी निवड करण्यात आली आहे.या कार्यकारणी च्या बैठकीमध्ये चर्चा होऊन उमेदवारीची निवड कोणत्या निकसाच्या आधारावर करण्यात यावी यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीनंतर समितीचा अधिकृत उमेदवार कोण? याबाबतही निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवड कमिटीची बैठक झाल्यानंतर तातडीने समितीच्या उमेदवाराची घोषणा होणार की आणखीन वेळ निवड कमिटी घेणार याकडे तालुक्यातील मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे.