IMG-20231127-WA0307
  • खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
  • खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्वाची बैठक सोमवार दिनांक २७/११/२०२३ रोजी संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी म ए समितीचे अध्यक्ष श्री गोपाळराव देसाई होते. यावेळी कर्नाटक सरकारने बेळगांव येथे ४ डिसेंबर २०२३ रोजी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म ए समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे खानापूर तालुका म ए समिती संपुर्ण ताकदीनिशी उतरणार असून हा मेळावा यशस्वी करणारच असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली, यामध्ये प्रामुख्याने विट निर्मितीसाठी माती उत्खननावर तहसिलदारांनी बंदी आणली आहे. हा व्यवसाय तालुक्यातील जनतेसाठी महत्वाचा आहे, तरी हा अन्याय दुर करण्यासाठी म ए समितीने प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन हाती घेण्याचे ठरले आहे. त्यासोबतच तालुक्यातील गावोगावी होणारा रेशन पुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्याचे ठरविले आहे. त्याचसोबत ऊस साखर कारखान्याला उचलला जावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच दिवसाढवळ्या चोरीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असून पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. तरी यावर कठोर कारवाई करून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. गावोगावी होऊ घातलेल्या महालक्ष्मी यात्रेला सोयीसुविधा लवकरात लवकर पुरवाव्यात आणि हे कार्यक्रम विनासायास पार पाडावे यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष्य घालावे अशी मागणी करण्यात आली. सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजना गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या जाव्यात यासाठी म ए समितीने सरकार दरबारी प्रयत्न करावेत. तसेच खानापूर-हेम्माडगा-अनमोड रस्त्याची पार दुर्दशा झालेली आहे आणि खानापूर ते चोर्ला रस्त्याची दुरवस्था झाली असून या दोन्ही रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी म ए समितीतर्फे प्रशासनाला निवेदन देण्याचे ठरविले आहे. तालुक्यातील अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच युवापिढी व्यसनाधीन झाली असून चरस, गांजा सारख्या घातक अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. पोलिस प्रशासन तसेच गुप्तचर खात्याला याच्या स्त्रोतांची आणि साखळीची संपूर्ण माहिती असुन तालुक्यातील अनेक बड्या धनदांडग्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कठोरात कठोर कारवाई करून तालुका व्यसनमुक्त करावा यासाठी म ए समितीकडून विशेष निवेदन देण्याचे ठरविले आहे, त्याबरोबरच समितीच्या वतीने समाजप्रबोधन करण्याचे ठरविलेले आहे. यावेळी प्रास्ताविक सरचिटणीस श्री आबासाहेब दळवी यांनी केले, सदर बैठकीत माजी आमदार श्री दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष श्री मुरलीधर पाटील, माजी सभापती श्री मारूतीराव परमेकर, माजी जि. पं. सदस्य श्री जयराम देसाई, समिती नेते प्रकाश चव्हाण, मध्यवर्ती म ए समिती सदस्य बाळासाहेब शेलार, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात गोपाळराव पाटील यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी बेळगांव मध्ये होणारा महामेळावा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील विभागवार जनजागृती करण्याचे ठरविले आहे. यावेळी या सभेला एम पी पाटील अध्यक्ष राजा शिवछत्रपती स्मारक ट्रस्ट, अजित पाटील, डी एम भोसले, रमेश देसाई, जयसिंगराव पाटील, शिवाजी पाटील, कृष्णा मन्नोळकर, चंद्रकांत कांबळे, गोपाळ हेब्बाळकर, राजाराम देसाई, मोहन गुरव, रणजीत पाटील, अमृत शेलार, कृष्णा कुंभार, म्हात्रू धबाले, पिराजी पाटील, प्रल्हाद मादार, मरु पाटील, वसंत नावलकर, रविंद्र शिंदे, संजीव पाटील, नारायण पाटील, शंकर गावडा इत्यादी उपस्थित होते. सभेचे आभार आबासाहेब दळवी यांनी मानले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us