खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समिती समोर अनेक आव्हाने आहेत. तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीची संघटना बळकट करण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांनी जबाबदारीनिशी काम करावे, प्रत्येकाने केवळ पद घेऊन बसण्यापेक्षा विभागावर बैठकी घेऊन संघटनेला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न करणे तसेच तळागाळातील मराठीसाठी झटणाऱ्या होतकरू व उमद्या कार्यकर्त्यांची विस्तारित संघटनेत समाविष्ट करून कार्यकरणीचा विस्तार करण्यात यावा. तसेच अंगणवाडी भरती प्रक्रियेत तृतीय भाषा कन्नड म्हणून शिकलेल्या मराठी भाषेवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देणे, खानापूर तालुक्यातून 60 शिक्षकांची बदली झाली असून यामुळे अनेक मराठी शाळा ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी त्या 60 शिक्षकांची बदली विरोधात गटशिक्षणाधिकार्याला घेराव घालून नूतन शिक्षक दिल्याशिवाय त्या 60 शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये अथवा त्यांना मोकळीक देण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूसंपादित शेतकऱ्यांना 8 दिवसात न्याय देण्याचे देण्यात आलेले आश्वासन याची पूर्तता झाली नसेल तर त्या विरोधात कशा पद्धतीने लढा उभारणे अशा अनेक विषयावर रविवारी झालेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सचिव आबासाहेब दळवी यांनी करून बैठकी मागचा उद्देश व्यक्त केला, यावेळी बोलताना महादेव घाडी यानी संघटना बळकटीसाठी मार्मिक विषयाला हात घालत समितीची संघटना केवळ कागदापुरताच न राहता ती कार्यात उतरली पाहिजेत. आतापर्यंत समितीचे पदाधिकारी केवळ पदे घेऊन बैठकीपुरता येत जात आहेत, असे न करता गावागावात बैठक घेऊन संघटने विषयी जागृती करणे व सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कायम कार्यतत्पर राहिले पाहिजे असे बैठकीत सूचित केले. तसेच नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड ही चर्चेअंती करण्यात यावी अशी मागणी काहींनी उचलून धरली. परंतु माजी आमदार दिगंबर पाटील व मारुतीराव परमेकर यांना दिलेल्या सर्वाधिकार्यानुसार निवड केलेली ही कमिटी तालुक्याच्या संघटनेला बळ देणारी ठरावी. असे अनेकांनी सुचित केले व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव तसे पदाधिकाऱ्यांचे अनेकांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.
विस्तारित कार्यकारणी निवडीचा अधिकार पदाधिकाऱ्यांना!
खानापूर तालुक्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. पण आता विस्तारित कार्यकारिणी निवड अत्यंत गरजेची आहे. ही विस्तारित कार्यकरिनी ही करताना तालुक्यात अनेक होतकरू तरुण आहेत, समितीनिष्ठ राखणारे कार्यकर्ते आहेत, धावपळ कार्यकरणारे आहेत अशा कार्यकर्त्यांची योग्यता पाहून त्यांना विस्तारित कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात यावी व पुन्हा एकदा संघटना बळकट करण्यासाठी झटले पाहिजे असे विचार गोपाळराव पाटील, बाळासाहेब शेलार, राजाराम देसाई, गावकर, वकील ए डी देसाई, आदींनी यावेळी उचलून धरली. यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील म्हणाले, समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तालुक्यात विस्तारित कार्य करणे करण्यासाठी येत्या चार दिवसात ठोस पावले उचलली जातील. शिवाय अंगणवाडी समस्या, शिक्षक बदली समस्या व जमीन भूसंपादित समस्या या संदर्भातही येत्या चार दिवसात संबंधितांना निवेदन देण्यासाठी पावले उचलली जातील. करिता वेळोवेळी निवेदन देण्यासाठी समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, समिती ही संघटना कोणत्या स्वार्थासाठी नसून सीमा प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नाच्या लढ्यात वाहून घेणारी संघटना आहे. संघटनेच्या बाबतीत असणाऱ्या अडीअडचणी ह्या समोरासमोर मांडून त्याचे निरीक्षण करणे योग्य आहे,पण पाठीमागे याची बोचक टीका करून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाय ओढण्याची प्रवृत्ती कोणीही करू नये असा सबुरीचा सल्ला दिला तसेच आगामी दिवसात समिती संघटना बळकट करण्याबरोबर समस्या विषयी आवाज उठवण्यासाठी संघटनेने काम करावे व लवकरच कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे विस्तारित कार्यकारिणी ही केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले
अध्यक्षस्थानावरून बोलताना गोपाळराव देसाई यांनीही कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांचे स्वागत करून आगामी काळात संघटना बळकटीसाठी योग्य ती विस्तारित कमिटी व कार्यकारणी करण्यात येईल, जेष्ठाना तसेच नवतरुणांना यामध्ये समाविष्ट करून संघटनेचे काम बळकट करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू यासाठी सगळ्यांचे सहकार्य मोलाचे असल्याचे विचार त्यांनी यावेळी मांडले. यावेळी व्यासपीठावर सीमा सत्याग्रही शंकरराव पाटील, उपाध्यक्ष जयराम देसाई, रमेश धबाले, रणजीत पाटील, कृष्णा कुंभार, पांडुरंग सावंत, मारुती गुरव कोषाध्यक्ष संजीव पाटील आदी उपस्थित होते.
सचिव आबासाहेब दळवी यांना अभिष्टचिंतन;
महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव व राष्ट्रपती पदक प्राप्त आदर्श शिक्षक निवृत मुख्याध्यापक आबासाहेब दळवी यांचा रविवारी 69 वा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पहार तसेच शाल श्रीफळ देऊन त्यांचा संघटनेच्या वतीने तसेच कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले यांनी शेवटी आभार मानले.