nagarpanchyat


खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:

खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाचे अखेर अडीच वर्षाच्या कालावधीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष पद दोन्हीही सामान्य महिला गटासाठी आरक्षित झाल्याने आता महिला गटात चूरस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी प्रत्येक वेळी लॉबिंग हे ठरलेलेच असते. पण यावेळी महिला गटासाठी आरक्षण आल्याने आता याकडे पुरुष नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खानापूर नगरपंचायतीमध्ये एकूण नऊ महिला सदस्या आहेत. यापैकी चार ते पाच महिला नगरसेविका या पदासाठी इच्छुक असल्याचे समजते. प्रामुख्याने नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांच्या पत्नी नगरसेविका मीनाक्षी प्रकाश बैलूरकर, भाजपा तालुका प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपीनकट्टी यांच्या पत्नी नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी तसेच माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका मेघा कुंदरगी यांच्यामध्ये प्रामुख्याने चुरस लागणार आहे.

  • काय आहे.. गटबंधन?

खानापूर नगरपंचायतीवर एकूण 20 नगरसेवक आहेत. यामध्ये मागील निवडणुकीच्या काळामध्ये नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावरून दोन गट तयार झाले. प्रारंभीच्या काळामध्ये 12 नगरसेवक विरुद्ध 8 नगरसेवक अशी गटबाजी झाली होती. नंतर अडीच महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात मजहर खानापुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर नारायण मयेकर यांना नगराध्यक्षपदी नियुक्त करताना त्या गटबंधन नगरसेवकांमध्ये एकी झाली होती. परत नंतर 14 विरुद्ध 6 अशा प्रकारे अंतर्गत गटबंधन झाले आहे. त्यामुळे आता अडीच वर्षाच्या पुढील नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष पदासाठी सामान्य महिला उमेदवार निवडीसाठी 14 विरुद्ध 6 अशा प्रकारे गटबंधन राहणार की याच्यामध्ये पुन्हा फोडाफोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण कोण आहेत.. इच्छुक?

खानापूर नगरपंचायतीवर एकूण 9 महिला सदस्य आहेत. त्यामध्ये शोभा गावडे , राजश्री तोपिनकटी, जयश्री भूतकी, मीनाक्षी बैलूरकर, मेघा कुंदर्गी, लता पाटील, सायरा सनदी, फातिमा बेपारी तसेच माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मी अंकलगी या महिला पात्र ठरू शकतात. पण सध्या परिस्थितीत मिळालेल्या माहितीनुसार चार ते पाच नगरसेविका या पदासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये मीनाक्षी बैलूरकर, राजश्री तोपिनकट्टी, मेघा कुंदर्गी, यासह अन्य दोघी इच्छुक असल्याचे समजते. पण मागील झालेल्या दोन गटातील गटबधनानुसार 14 विरुद्ध 6 असे गटबंधन आहे. 14 नगरसेवकांचे गटबंधन कायम राहिल्यास विद्यमान नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांच्या पत्नी मीनाक्षी बैलूरकर तसेच भाजपा प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी यांच्या पत्नी नगरसेविका राजश्री तोपिकनट्टी यांची वर्णी लागू शकते. असे चर्चेत आहे.

यांना आहे वरिष्ठांचा वरदहस्त

एकीकडे प्रकाश बैलूरकर यांना माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा तर गुंडू तोपिनकट्टी यांना भाजपा आमदार विठ्ठल हलगेकर यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे आम्ही दोघे भाऊ आणि वाटून खाऊ असा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर नगरसेविका मेघा कुंदरगी यांच्या बाजूनेही अनेक नगरसेवक आहेत. मागील वेळी आठ जणांचे गटबंधन होते. ते कायम राहिल्यास त्याही या दोन्हीपैकी एका पदासाठी वरचढ होऊ शकतात, यात शंका नाही. पण 20 नगरसेवकापैकी किती नगरसेवक कोणाच्या बाजूने प्रामाणिक राहतील की खोकेबाजीवर पलटतील यावर नगरपंचायतीचे राजकारण कळणार आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us