खानापूर लाईव्ह न्युज) प्रतिनिधी:
- उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस ही चुरशीची लढाई सुरू झाली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार ? याकडे संपूर्ण उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रातील मतदारांचे लक्ष लागले आहे. प्रामुख्याने खानापूरच्या स्थानिक उमेदवार विरुद्ध शिरशीचे उमेदवार अशा कडव्या लढतीमध्ये ही झुंज होणार आहे. उत्तर कन्नड अर्थात कारवार जिल्ह्यातील प्रतिष्ठेची लढाई असली तरी तितकीच खानापूर विधानसभा क्षेत्रातील अति प्रतिष्ठेची लढाई म्हणावी लागेल.खानापूर विधानसभा क्षेत्रामध्ये माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या कार्याचा सलग दहा वर्षे दबदबा कायम ठेवला आहे. समाज सेवेपासून आमदारपदही भोगले.तरीही त्या हटल्या नाहीत. सध्या लोकसभा निवडणुकीत डॉ. निंबाळकर यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. कारवार जिल्ह्यातील परिस्थिती वेगळीच असल्याचे चित्र आहे. मात्र खानापूर तालुक्यातील राजकीय नेते तथा मतदार केवळ खानापूर तालुक्याच्या मतदानाचा विचार करत आहेत. यावेळी कुणाला किती टक्के मतदान याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. उत्तर कन्नड लोकसभा भाजपात अलबेल नसल्यामुळे बरेच कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. अशा मध्ये खानापूर तालुक्यातील मताधिक्य कोण घेणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. परिणामी खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते कसून कामाला लागले असून कोणत्याही परिस्थितीत लाखाचे मताधिक घेणार असा अविर्भाव करत आहेत. पण तितक्याच ताकतीने डॉ .अंजलीताई निंबाळकर यांनीही आपली फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपवाल्यांना आता डोईजड झाले आहे.
- एकंदरीत खानापूरच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता खानापूर तालुक्यामध्ये समितीचा असलेला गड ढासळून भाजप ने दोनदा, तर काँग्रेस ने एक वेळ त्यावर कब्जा केला आहे, खानापूरच्या राजकारणात महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद कुठेतरी मागे पडत चालली आहे. याला समितीतीलच काही नेतेमंडळी कारणीभूत असली तरी आगामी राजकारणात मात्र खानापूरच्या तक्तावर भाजप किंवा काँग्रेस असेच राजकारण राहणार आहे. खानापूर तालुक्यात विधानसभेवर भाजपचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपवाल्यांनी आता लोकसभेच्या रणांगणात प्रतिस्पर्धी असलेल्या अंजली निंबाळकर यांना दिल्लीच्या तक्तावर पाठवून खानापूरच्या राजकारणाचा आखाडा आपल्यासाठी खुला का ठेवू नये. याचा सारासार विचार भाजपवाल्यांनी करण्याची नितांत गरज आहे. डॉ. अंजलीताई निंबाळकर या खासदार म्हणून दिल्लीच्या तक्तावर गेल्या तर खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करण्याची ताकद कुणाकडे रहाणार? हा प्रश्र्न निरुतरित आहे. खानापुरात मागील पंधरा वर्षात स्वर्गीय रफिक खानापुरी यांच्या माध्यमातून विधानसभेच्या तीन निवडणुका काँग्रेस पक्षाने लढवल्या. पण तालुक्याने त्या स्वीकारल्या नाहीत. पण डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या माध्यमातून खानापूर तालुक्यात एक भक्कम व सक्षम असा उमेदवार मिळाल्याने खानापूर तालुक्यात प्रदेश काँग्रेस पक्षाने आपले खाते खोलले खरे, पण 2023 च्या निवडणुकीत भाजपने तो गड पुन्हा ताब्यात घेतला. याची कारणेही तशीच आहेत. आपलं, परक्या असा भेदभाव करत विरोधकांनी खिंडार पाडले. त्यामुळे काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. पण डॉ.अंजली निंबाळकर या हटल्या नाहीत पुन्हा त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत आपली कसरत दाखवली आहे.
- भारतीय जनता पार्टीमध्ये खानापूर तालुक्यामध्ये अनेक सक्षम नेते मंडळी आहेत. एकेकाळी 15 ते 16 जण आमदारकीसाठी इच्छुक होते. त्यामध्ये जणू स्पर्धाच लागली होती. शेवटी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बाजी मारली. अनेकांचे स्वप्न मात्र अजूनही राहिलेच. नाराजीचा सूर मागे पुढे ठेवून अनेकांनी भाजपचा गड राखला. पण याला काँग्रेस पक्षाच्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी कडवे आवाहन दिले.
- सध्या परिस्थिती लोकसभा मतदारसंघात डॉ. अंजली निंबाळकर यांना काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी देऊन एक वेगळाच पायंडा घातला आहे. लोकसभेच्या या उमेदवारीत डॉ अंजली निंबाळकर यांनी कारवार लोकसभेचा गड जिंकला तर खानापूरच्या काँग्रेसच्या राजकारणात मात्र दुसरा सक्षम नेता नसल्यामुळे खानापूरच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हा लाभदायक ठरेल यात शंका नाही. कारण जिंकून आल्या तर खानापूर तालुक्यासह कारवार जिल्ह्यातील विकासाकडे त्यांचे लक्ष लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला विधानसभेसाठी नवीन चेहऱ्याची गरज भासणार आहे. अशावेळी काँग्रेस पक्षात सक्षम नेतृत्वाची गरज भासणार ? असे असताना खानापुरातून डॉ. अंजली निंबाळकर यांना होणारा कडवा विरोध का ?असा प्रश्न सामान्य मतदार करत आहेत. याचा विरोधी पक्षातील वरिष्ठ व आमदारकीची दावेदारी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी हजार वेळा विचार करण्याजोगा आहे. त्यामुळे सात मे रोजी होणारी ही निवडणूक जितकी प्रतिष्ठेची आहे तितकीच तालुक्यातील विरोधी पक्षातल्या नेत्यांना सोपस्कर राहणार आहे.
- काँग्रेस पक्षाच्या डॉ. अंजली निंबाळकर यांना मताधिक देऊन निवडून दिल्यास खानापूर तालुक्यातील राजकीय मंडळींचे राजकीय दालन ओपन राहणार आहे. याचा सारासार विचार होणे गरजेचे असल्याचे अनेक सुज्ञ नागरिकांचे मत आहे. त्यामुळे मतदान कुणाच्या पारड्यात पडणार याकडेही लक्ष लागले आहे. खरं तर खानापूर तालुक्यातून स्थानिक म्हणून व बहुभाषिक मराठा असलेल्या या भागातून उमेदवारी मिळालेल्या डॉ. अंजली निंबाळकर या सक्षम नेत्या आहेत. त्यांना लोकसभेच्या उमेदवारीत निवडून दिले तर त्या दिल्ली तक्तावर आपल्या राजकारणाची रणनीती आखतील. त्यामुळे खानापुरात प्रदेश काँग्रेस पक्षाकडे तसे दुसरे नेतृत्व आजवर तयार झाले नाही. त्यामुळे खानापूर भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीला प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस पक्षातून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सक्षम राहणार नाही. जर एखाद्या वेळेस डॉ. अंजली निंबाळकर ह्या लोकसभेच्या निवडणुकीत मागे राहिल्या. तर मात्र खानापुरात कायमचे प्रस्त वाढतच राहणार याचा सारासार विचार करता खानापूर तालुक्यातून उच्चांकी मतदान देऊन भारतीय जनता लोकसभेच्या निवडणुकीत मागे राहिल्या तर मात्र खानापुरात कायम स्पर्धा वाढतच राहणार याचा सारासार विचार करता खानापूर तालुक्यातून उच्चाकी मतदान देऊन भाजप सह इतर पक्षातील नेत्यांनी विचार केल्यास तो त्यांच्याच भल्याचा होईल असे विचार अनेक सुज्ञ नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहेत.