खानापूर प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील खैरवाड येथे नव्याने स्थापन करण्यात येत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे खानापुरात जंगी स्वागत करण्यात आले. रविवारी सकाळी कोल्हापूर येथून सदर मूर्ती खानापुरात येताच ढोल ताशाच्या निनादात जांबोटी क्रॉस बसवेश्वर सर्कल पासून सवाद्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने विषभूषाधारक युवा कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डोकीवर कलश घेऊन महिलांनी मोठ्या उत्साहाने या भव्य मिरवणुकीत सहभाग दर्शवला होता. शिवाय अनेक युवकांनी छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून एक आकर्षक अशी मिरवणूक खानापूर शहरातून झाली. खानापूर येथील शिवस्मारक चौकात येताच महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी आबासाहेब दळवी प्रकाश चव्हाण, यशवंत बिरजे, रुकमाना झुंजवाडकर सह मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनीही या छत्रपती शिवरायांच्या भव्य मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन शिवरायांना अभिवादन केले. यावेळी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
खानापूर शहरातून सदर मूर्तीचे रुमेवाडी क्रॉस पर्यंत उत्साहाने स्वागत झाले. त्यानंतर खानापूर ते नंदगड मार्गावर येणाऱ्या अनेक गावातील शिवप्रेमींनी मूर्तीचे पुष्पहार घालून व महिला भगिनींनी आरती ओवाळून स्वागत केले. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता नंदगड बाजारपेठ येथून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक झाली. बाजारपेठेतून संगोळी रायण्णा स्मारकापर्यंत जल्लोषी मिरवणूक झाली. खैरवाड गावापर्यंत या मिरवणुकीत अनेक शिवप्रेमी व उत्साही युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला होता.
10 जून रोजी होणार लोकार्पण सोहळा
खैरवाड या ठिकाणी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारुढ चौथऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक उपक्रम राबवत येथील युवकांनी देणगी व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी या शिवरायांच्या चौथ्यासाठी व मूर्तीसाठी सहकार्याचा हात उभारला आहे.या ठिकाणी तयार करण्यात आलेली मूर्ती खानापूर तालुक्यातील सर्वात मोठी मूर्ती राहणार आहे. सदर मूर्ती ब्रांच (पंचधातू )पासून तयार करण्यात आली असून मूर्तीसाठी तब्बल 15 लाखाहून अधिक रुपयाचा निधी देण्यात आला आहे. शिवाय या मूर्ती समवेत राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी राजे, दोन तोफा व मावळे अशा अनेक मुर्त्या सोबत आहेत. छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारुढ मूर्तीची उंची 9ft असून रुंदी 5 फूट आहे. त्यामुळे एक आकर्षक मूर्ती खानापूर तालुक्यातील खैरवाड या ठिकाणी साकारली जाणार असल्याने या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे जल्लोषी स्वागत या ठिकाणी केले जात आहे. येत्या 10 जून रोजी भव्य थाटामाटात या मूर्तीचा लोकार्पण सोहळा होणार आहे.