- बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे अनैतिक संबंधातून पत्नीने पतीचा संशयास्पद खून केल्याची घटना घडली आहे. सुभाष कल्लाप्पा हुरुडे (वय ५६) असे मृताचे नाव आहे. त्याच्या पत्नीनेच त्याचा खून केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
- याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंग्राळी बुद्रुक येथील व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या सुभाष कल्लाप्पा हुरुडे याचा मृतदेह त्याच्याच रिक्षात संशयास्पद स्थितीत आढळून आला. या परिसरात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी मोठ्याना ही माहिती दिल्यावर खुनाचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, सुभाषच्या भावांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुभाषची पत्नी रंजना गेल्या सोमवारी रात्री अडीज-तिनच्या सुमारास घरी आल्याने सुभाषने तिला जाब विचारला. त्यामुळे पती-पत्नीत भांडण झाले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी सुभाषने ग्राम पंचायतीत महिला सदस्यांकडे तिची तक्रार करण्यासाठी जात असताना रंजनाने त्याला पाठलाग करून मारहाण केली. त्यानंतर त्याला मागच्या दरवाज्याने घरात आणून मारहाण करण्यात आली. तेंव्हाच त्याचा मृत्यू झाला असावा. त्यानंतर त्याला त्याच्याच रिक्षातून हा सर्व प्रकार गावातील लोकांनी पाहिला आहे. तो रिक्षात मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर गल्लीतील युवकांनी शाहूनगरमध्ये जाऊन पाहिले असता, सुभाष मृतावस्थेत आढळला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
- दरम्यान, या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, उत्तरीय तपासणीनंतर सुभाषचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या मागे २ मुली, १ मुलगा, २ भाऊ, बहीण असा परिवार आहे. पोलिसांनी यातील सत्य शोधून दोषींवर कठोर कारवाई करून सुभाषला न्याय द्यावा अशी मागणी त्याचे भाऊ, नातेवाईक व गावकऱ्यांनी केली आहे.