खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
जांबोटी सारख्या जंगल पट्ट्यात असलेल्या खेड्यापाड्यातील लोकांना एकत्रित करून त्यांना सहकार क्षेत्राच्या सावलीत आणण्याचे काम गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या संस्थेने हाती घेतले आहे. जांबोटी मल्टीपर्पज सोसायटी ही सर्वसामान्य व गोरगरिब अनेक गरजूंना पतपुरवठा तसेच नोकरी व्यवसाय व उद्योगधंद्यासाठी नेहमी सहकार्याचा हात उचलला आहे. जन माणसातील ही संस्था अशीच कायम सक्रिय रहावी यासाठी राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करणे ही आमची जबाबदारी आहे. म्हणूनच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ग्राम पंचायतीवर नव्याने नियुक्त झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष या लोकप्रतिनिधींचा सन्मान करणे हे देखील आमचे आद्य कर्तव्य समजून छोटासा सन्मान आयोजित करण्यात आला असल्याचे विचार संस्थेचे संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर यांनी व्यक्त केले. येथील जांबोटी बाबुराव ठाकूर पदवी पूर्व महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व नूतन लोकप्रतिनिधींचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात जांबोटी भागातील तसेच संस्थेच्या भागधारक गुणवंत विद्यार्थी विविध क्षेत्रात विजेत्यांचा सन्मान तसेच ग्रामपंचायतच्या जांबोटी, बैलूर गोल्लाळी, पारवाड, कणकुंबी, आमटे तसेच निलावडे या ग्रामपंचायती अध्यक्ष उपाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी सहसंचालक मंडळ उपस्थित होते. संस्थेचे महाव्यवस्थापक दिलीप हनुरकर यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले.