खानापुरात नूतन शिशु आणि महिला हॉस्पिटलचे उद्घाटन! नूतन सार्वजनिक तालुका हॉस्पिटल इमारतीचा भूमिपूजन
खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्याच्या आरोग्यवंत विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. खानापुरातील आरोग्य खात्याअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र तसेच तालुका सार्वजनिक हॉस्पिटल च्या विकासाबरोबर विविध ठिकाणी नव्याने उपकेंद्र स्थापन करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध राहील. खानापूर तालुक्याच्या आरोग्य विकासासाठी आमदार विठ्ठल हलगेकर माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याचा आपण गांभीर्याने विचार करून या भागातील जनतेला राजकारण अविरहित सुविधा पुरवण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध राहील. असे विचार कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडराव यांनी व्यक्त केले. बुधवारी खानापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शिशु आणि महिला साठ बेडच्या हॉस्पिटलचा इमारतीचा उद्घाटन तथा तालुका सार्वजनिक हॉस्पिटलच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ पार पडला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात 100 खाटाच्या नूतन सार्वजनिक हॉस्पिटल चा भूमिपूजन बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाला. तर 60 बेडच्या 15 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव व माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर, जिल्हा पंचायत चे कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी तहसीलदार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी बोलताना आरोग्य मंत्री दिनेश गुंडराव यांनी खानापुरातील शंभर बेडचे हॉस्पिटल हे तालुक्याच्या आरोग्याचे वैभव ठरणार आहे तालुक्यातील लोकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. या इमारतीसाठी 30 कोटीचा निधी मंजूर झाला असून याची सोपस्कार प्रक्रिया लवकरच पूर्ण करून येत्या महिन्याभरात जुनी इमारत डॅमॉलेशन करून या ठिकाणी लवकरात लवकर नवीन इमारत उभी केली जाणार आहे. शिवाय नवीन शिशु आणि महिला हॉस्पिटलमध्ये आवश्यक सुविधा कर्मचारी डॉक्टर्स त्याचप्रमाणे आवश्यक मशिनी पूर्ण करून तालुक्यातील जनतेला सुविधा पुरवू असे सांगितले त्याप्रमाणे खानापूर तालुक्यातील विविध उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी व तेथील प्रगतीसाठी लागणाऱ्या निधी तातडीने पूर्ण करू त्यासाठी तालुक्यात एकूण जवळपास दीड कोटीचा निधी मंजूर करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी तालुक्यातील आरोग्य परिस्थितीची जाणीव लक्षात ठेवा मागील आपल्या आमदारकीच्या काळामध्ये आरोग्य विभागासाठी 15 कोटीच्या निधीतून शिशु आणि महिला या नवीन आवश्यक हॉस्पिटल ची इमारत मंजूर केली यासाठी लागणारी यंत्रसामुग्री व कर्मचारी तातडीने सरकारने पुरवावी त्याचबरोबर तालुका सार्वजनिक हॉस्पिटलच्या उभारणीसाठी लवकरात लवकर निधीची तरतूद करून द्यावी असे सुचित करून आपण तालुक्याच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहणार असून कोणतेही राजकारण यासाठी आड येणार नाही असे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्यात आरोग्य विभाग सुधारित करण्यासाठी या तालुका सार्वजनिक हॉस्पिटल व महिला आणि शिशुविभागासाठी आवश्यक सुविधापुरता शिवाय तालुक्यात आणखी चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावेत. जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी व त्या ठिकाणी लागणारे सुविधा पूर्ण करावी अशी मागणी करून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारण आड न येता जनतेच्या विकासासाठी आपले कार्य राहणार आहे असे सांगून मंत्र्यांच्या कडे विविध मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.
कार्यक्रमात प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी महेश किडसनावर यांनी करून तालुका आरोग्य विभागातील आतापर्यंत राबवण्यात आलेल्या योजना व यासाठी आवश्यक बाबी संदर्भात माहिती दिली. वैद्याधिकारी नारायण वडीनावर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला आरोग्य विभागातील कर्मचारी अशा कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.