वार्ताहर/कणकुंबी
येथील विश्व भारत सेवा समितीच्या कणकुंबी श्री माऊली विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, आणि बक्षीस वितरण असा संयुक्त कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावर्षी मार्च एप्रिल महिन्यात झालेल्या दहावीच्या परीक्षेत खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमात प्रथम क्रमांक मिळविलेला कणकुंबी हायस्कूलचा विद्यार्थी मोनेश महेश गावडे याचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी होते.
प्रारंभी विद्यालयाच्या विद्यार्थीनीच्या इशस्तवन आणि स्वागत पद्याने सुरुवात झाली.दिपप्रज्वलन भारतीय सीमा सुरक्षा दलाचे सेवानिवृत्त डीआयजी अशोक पाटील, विजय नंदिहळ्ळी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्याध्यापक एस जी चिगुळकर यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, विद्यालयाच्या शैक्षणिक इतिहासात यावर्षी मोनेश गावडे याने दहावीच्या परीक्षेत तालुक्यात तृतीय क्रमांक व मराठी विभागात प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचे,आईवडीलाचे व गावचे नाव उज्ज्वल केले आहे.यापध्दतीने सर्व विद्यार्थ्यांनी मोनेशचा आदर्श घेऊन प्रयत्न करावेत असे सांगून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी सेवानिवृत्त डीआयजी अशोक पाटील यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या मोनेश गावडे याला 6 हजार रुपये रोख व ट्रॉफी देऊन सन्मानित केले. तसेच नव्वद टक्के पेक्षा अधिक मार्क्स मिळविलेली कुमारी अपर्णा गावडे, कृष्णा उशिणकर,श्वेता सुतार व आठवी आणि नववीत प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये रोख व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
* कै.गोविंद लक्ष्मण तळवलकर कोळेकर स्मृती पुरस्कार *
कणकुंबी गावचे रहिवासी व गोवा सुर्ला शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक कै.गोविंद कोळेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र व रुमेवाडी शाळेचे शिक्षक परशुराम कोळेकर यांनी दहावीच्या परीक्षेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक घेतलेल्या विद्यार्थ्यांना आजीवन बक्षीस योजना सुरू करून यावर्षीच्या पात्र विद्यार्थ्यांना स्वहस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली.
- किंजवडेकर स्मृती पुरस्कार *
- मुळचे कणकुंबीचे व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले श्रीकांत किंजवडेकर यांनी आपली बहीण कै.सौ.उषा किंजवडेकर उर्फ तळवलकर स्मृती पुरस्कार,कै.डॉ.शंकर पांडुरंग किंजवडेकर स्मृती पुरस्कार व कै.सुधा दिवाकर किंजवडेकर स्मृती पुरस्कार दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
- कै.नारायण गावडे स्मृती पुरस्कार *
पारवाड गावचे सुपुत्र व विदेशी कंपनीतून निवृत्त झालेले सुधाकर गावडे यांनी आपले आईवडील कै.नारायण गावडे व कै.लक्ष्मी नारायण गावडे यांच्या स्मरणार्थ बॅंकेत ठेवलेल्या ठेवीतून दरवर्षी येणाऱ्या व्याजामधून दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी निवृत्त डीआयजी अशोक पाटील, शिक्षक परशुराम कोळेकर, प्राथमिक शाळा मुख्या.एस.डी.मुल्ला, व विजय नंदिहळ्ळी यांची भाषणे झाली.तर गुणवंत विद्यार्थी मोनेश महेश गावडे व माजी विद्यार्थी परशुराम कोळेकर यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सोनम जाधव व सरोज जाधव शिक्षक बी.एम.शिंदे,एस.आर.देसाई, विजय गावडे व नेताजी घाडी आदी उपस्थित होते.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन एन.एस.करंबळकर यांनी केले.