खानापूर /प्रतिनिधी ; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या पाच गॅरंटी कार्ड पैकी एक गॅरंटी कार्ड म्हणजे 200 युनिट मोफत विज होय. आता या 200 युनिट मोफत विज साठी सेवा सिंधू ॲप्स द्वारे ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे निर्देश सरकारने केले आहे. पण सेवा सिंधू ॲप्स वर नोंदणी करताना मीटर ग्राहकाचे नाव व आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्याने गेल्या अनेक वर्षापासून आजोबा, पंणजोबा किंवा मयत व्यक्तीचे नावे नोंदणी असलेल्या मीटर धारकांना आता अडचणीचे बनले आहे. जोपर्यंत आधार कार्ड व मीटर नोंदणीतील नाव त्याचे साम्य राहणार नाही. तोपर्यंत 200 युनिट मोफत वीज पुरवठा मिळणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या घरातील मरण झालेल्या व्यक्तीच्या नावे असेल तर ते आता वारसा प्रमाणे बदलणे गरजेचे आहे. त्यानंतरच या सेवा सिंधू ॲप्स वर आपल्या मीटरची नोंदणी करता येते. त्यामुळे आता पुन्हा एकदा ग्राहकांना अडचणींना सामोरे जावा लागणार आहे. एकंदरीत गेल्या 30 /40 वर्षापासून आजोबा, पंजोबा अशा अनेक व्यक्तींच्या नावे हेस्कॉम खात्याची मीटर नोंदणी आहे. पण ते अनेक वर्षे मयत होऊनहि अनेक ग्राहकांनी वारसा प्रमाणे ती नोंदणी केली नाही. त्यामुळे आता सेवा सिंधू ॲप्स वर नोंदणी करताना ज्यांच्या नावे मीटर आहे, त्यांचेच आधार कार्ड लिंक होणार असल्याने या योजनेचा आता किती लोकांना फायदा होणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी आतापासूनच हेस्कॉम खात्याकडे हेलपाटे मारण्यास सुरुवात केली असून आपल्या मयत आजोबा पणजोबांची नावे कमी करून आता ती पुढील वारसदारांच्या नावे करण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे.
अनेक ग्राहकांना बसणार आता नाहक बुर्दंड .
वारसा प्रमाणे नाव नोंद करण्यासाठी वारसदार पत्र संमती पत्र अशा अनेक गोष्टी लागणार असल्याने त्यासाठीही आता खाजगी एजंटांच्याकडे करून नाहक भुर्दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे नको रे बाबा… 200 युनिट वीज फ्री अशी म्हणण्याची वेळ तर नागरिकांच्यावर येणार नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. हेस्कॉम खात्यानेही आतापर्यंत ग्राहकांची वीज बिल भरणा वेळेत करून आपले टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण मीटर नोंदणी कुणाच्या नावे आहे,याकडे कधीच पाहिले नाही. केवळ आपले वेळेत बिल भरणा करण्याइतपतच खात्याने धोरण राबवले आणि ग्राहकानीही ही ते मान्य केले. पण आता सरकारच्या मोफत वीज योजनेत सेवा सिंधू ॲप्स वर नोंदणी करताना मात्र अडचण निर्माण झाल्याने आता वारसा प्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून त्याची नोंदणी केल्यानंतरच याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता हे करावेच लागणार व यासाठी धावपळ ही होणारच.
1 तारखेपासून या योजनेला प्रारंभ झाला आहे. बहुतांश लोकांना आपल्या मीटरचे नाव नेमके कुणाच्या नावे आहे हेच माहीत नाही. पण सेवा सिंधू अप्सवर नोंदणी करण्यासाठी गेल्यानंतर याचे उत्तर बहुतांश ग्राहकांना मिळणार आहे. चला तर मग ग्राहकांनो….. तुमचे मीटर बिल काढा आणि नाव कोणाचे आहे ते पहा.