
खानापूर: तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आता वेग आला असून येत्या 20 मार्च रोजी या ग्रामपंचायतीवर नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे यानुसार प्रांताधिकारी कार्यालयातून नोटीस जारी करण्यात आली आहे. हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आता नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीच्या सदस्यांना नोटीस देण्यात आली असून, 20 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

ही जागा मागासवर्गीय “ब” गटासाठी राखीव असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून कृषी विभागाचे कार्यकारी अधिकारी मंजुनाथ मावीनकोप काम पाहणार आहेत. निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नामनिर्देशन अर्ज भरणे, छाननी, अर्ज मागे घेणे आणि गरज पडल्यास मतदानाची प्रक्रिया अशा टप्प्यांत निवडणूक पार पडेल. मतमोजणीनंतर निकाल तत्काळ जाहीर केला जाणार आहे.