खानापूर: दख्खनचा राजा श्री ज्योतिबा हे अनेक हिंदू धर्मियांचे आराध्य व कुलदैवत मानले जाते. दरवर्षी या दैवताच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भावी जातात. खानापूर तालुक्यातही अशाच प्रकारे दख्खनचा राजा जोतिबाचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत.प्रामुख्याने खानापूर तालुक्यातील हलकर्णी येथील चौगुले घराण्याने दख्खनचा राजा जोतिबाची सासनकाठी व नित्य बैलगाडीतून देवदर्शन प्रवास दरवर्षी हाती घेतात. रविवारी सकाळी श्री यल्लाप्पा परशराम चौगुले यांनी दरवर्षीप्रमाणे खानापूर ते ज्योतिबा डोंगर पर्यंत बैलगाडीतून सासनकाठी यात्रेला सुरुवात केली. आपल्या कुलदैवतापासून त्यांनी श्रीक्षेत्र दख्खनचा राजा जोतिबा डोंगरापर्यंत बैलगाडी सजवून मार्गस्थ केले . यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी दाम्पत्याने त्याची पूजा करून शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी हलकर्णी गावात आपल्या कुलदेवता समोर बैलगाडीची पूजा करण्यात आली. यावेळी राम फोटो स्टुडिओचे मालक मोहन पाटील, दिलीप सोनटक्के सह अनेक जण उपस्थित होते.
साधारणपणे होळी सणापासुनच गावात याञेची तयारी चालु होते. गुढीपाडव्या नंतर हे निशान यात्रेसाठी जोतिबा डोंगराकडे प्रस्थान करते. जोतीबाकडे २० ते २५ बैलगाड्या या मानाच्या सासनकाठीसोबत जातात.आजच्या धावपळीच्या युगातही ही बैलगाडी नेण्याची परंपरा जोपासली आहे. हलकर्णी येथील स्वर्गीय परशराम चौगुले यांच्या घराण्याने ही परंपरा अखंडपणे राखली आहे आज त्यांचा मुलगा यल्लाप्पा चौगुले यांनीही परंपरा कायम ठेवून दरवर्षी राजा जोतिबा डोंगरावर बैलगाडी द्वारे शासनकाठी यात्रेत मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात.
चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिल मध्ये जोतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते. बेळगांव सह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे सहा-सात लाख भाविक या यात्रेसाठी येतात. या वेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहभान हरपून, ‘चांगभलं’ च्या एकच जयघोषात जोतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अवघा डोंगर या एकच जयघोषाने दुमदुमून जातो.
सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजय ध्वज
शिखरी काठी, नंदीध्वज, तरंग अशी विविध नाव घेऊन ही प्रथा दख्खन पठार, कोकण, माणदेश, मावळ, मराठवाडा, विदर्भ भागात सर्वत्र आढळते. पाडळीची सासनकाठी “कुलध्वज” या प्रकारात मोडते.याच मूळ कालिका पुराणातल्या इंद्र ध्वज महोत्सवाशी संबंधित आहे. वर्षेभर झालेल्या गोष्टी व पुढील वर्षी चे नियोजन दख्खनचा राजा जोतिबा चरणाशी सांगणे या पूर्वंपार चाललेल्या परंपरेने आज ही हजारो सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर जातात. अशाच प्रकारे बेळगाव जिल्ह्यातून अनेक गावातून या शासन काट्या मोठ्या भक्ती भवानी ज्योतिबा डोंगराकडे प्रस्थान होतात यामध्ये खानापूर तालुक्यातील हलकर्णी चौगुले घराण्याने ही परंपरा कायम राखली आहे.