खानापूर प्रतिनिधी : येत्या 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मतदान जागृती अभियान राबविले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवार निवडा. आपले मत बहुमोल आहे, ते विकू नका, आमिषाला बळी पडू नका. असे आवाहनात्मक संदेश मतदारांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. या अनुषंगाने खानापूर तालुका पातळीवर नुकताच निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.
या अंतर्गत खानापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीमध्येही हे अभियान राबवण्यात आले आहे. तालुक्याच्या दक्षिण भागातील गोधोळी ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी मतदान जागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी हनुमंत पाटील, सचिव नागेश नवलगी तसेच ग्रामपंचायतीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
यावेळी जागृती करताना विकास अधिकारी हनुमंत पाटील म्हणाले, आपला भारत देश एक लोकशाही प्रजासत्ताक आहे, जिथे लोक राज्य करतात, लोक त्यांच्या मताधिकाराचा वापर करून अशा व्यक्तीची निवड करतात, जो देशाच्या विकासासाठी सक्षम असेल आणि देशाची सूत्रे कुशलतेने हाताळू शकेल. प्रत्येक व्यक्तीचे मत हे खूप मौल्यवान आहे. सरकार बनवण्यात देशातील प्रत्येक मतदाराची भूमिका महत्त्वाची असते. यासाठी येत्या निवडणुकीत प्रत्येक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, आपले मत विकू नका व मतदानाचा टक्का वाढवा असे आवाहन करून ग्रामपंचायत क्षेत्रातील गावात अभियान राबवण्यात आले.