खानापूर तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या उसाला तातडीने तोडणीची मागणी! कारखाने त्वरित सुरू करा! शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या!
खानापूर तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या उसाला तातडीने तोडणीची मागणी!
२०० एकरांहून अधिक ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; साखर कारखान्यांनी प्राधान्याने ऊस उचलावा, अन्यथा शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी – शेतकऱ्यांचे निवेदन
खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात विद्युत वाहिन्यांमधील शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेतांना आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच पावसाची कमतरता, सिंचनाच्या समस्या आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता जळालेल्या उसाचे काय करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत जळालेल्या उसाची तातडीने तोडणी करून संबंधित साखर कारखान्यांनी हा ऊस प्राधान्याने गाळपासाठी स्वीकारावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात ३० ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात तालुक्यातील कानसुली, रामगुरवाडी, गणेबैल, गुंडपी सह काही गावात शॉर्टसर्किटमुळे जळालेल्या सुमारे २०० एकरांहून अधिक उसाची तातडीने तोडणी करून कारखान्यांकडे वाहतूक करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जळालेल्या उसाला साखर कारखान्यांनी प्रथम प्राधान्य द्यावे. कारखान्यांना जळालेला ऊस स्वीकारणे शक्य नसल्यास संबंधित शेतकऱ्यांना १०० टक्के योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय दुष्काळसदृश परिस्थितीमुळे वाळत चाललेल्या उसाचीही प्राधान्याने तोडणी करावी. अन्यथा उसाचे वजन घटून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोडणी व वाहतुकीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
खानापूर तालुक्यातील साखर कारखाना येत्या काही दिवसांत कार्यान्वित करण्याबाबतही निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीच पावसाची कमतरता, सिंचनाच्या समस्या, पिकांचे नुकसान आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत जळालेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासन आणि साखर कारखाना व्यवस्थापनाने तातडीने लक्ष घालावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे.
या निवेदनाची प्रत आमदार विठ्ठलराव सोमण्णा हलगेकर यांच्यासह संबंधित साखर कारखाना व्यवस्थापन आणि पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. निवेदनासोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादीही जोडण्यात आली आहे.
जळालेला ऊस वेळेत कारखान्यापर्यंत पोहोचला नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिक वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी अपेक्षा खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खानापूर लाईव्ह