चापगाव मलप्रभा हायस्कूलमध्ये आंतरशालेय चित्रकला व हस्तकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
चापगाव मलप्रभा हायस्कूलमध्ये आंतरशालेय चित्रकला व हस्तकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
१७० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेत्यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरव
खानापूर / प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि चित्रकला व हस्तकलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मलप्रभा हायस्कूल, चापगाव येथे आयोजित आंतरशालेय चित्रकला व हस्तकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत १७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पिराजी कुराडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांनी केले.
यावेळी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे समन्वयक तथा निवृत्त मुख्याध्यापक एस. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला व हस्तकलेची आवड निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शिक्षण मंडळाकडून क्रीडा महोत्सवासह विविध उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. त्याच धर्तीवर आंतरशालेय स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कला प्रत्येकाच्या अंगी जन्मजात असतेच असे नाही; मात्र योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास विद्यार्थ्यांमधील कलागुण निश्चितच विकसित होऊ शकतात. त्यामुळे शैक्षणिक उपक्रमांच्या यशस्वितेसाठी दानशूर व्यक्ती, पालक आणि समाजातील विविध घटकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मलप्रभा हायस्कूल, चापगावने यंदा या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारून विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी शाळेचे कौतुक केले.
कार्यक्रमात बेनकनहल्ली शाळेचे निवृत मुख्याध्यापक पी आर पाटील सुंडी हायस्कूलचे निवृत मुख्याध्यापक एस बी पाटील सिव्हिल इंजिनिअर सुधीर पाटील, उद्योजक नागराज यळूरकर, मारुती चोपडे, हाडाचे वैद्य रोशन पाटील, निवृत्त मुख्याध्यापक भालचंद्र पाटील, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य पी. के. चापगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विविध महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी कृषी पतींचे संचालक संजय बेळगावकर, माजी उपप्रधान विजय कडबी, पांडुमामा पाटील, मष्णू सुतार, रमेश घारसी, कलाप्पा पाटील, नारायण जांबोटकर, रुक्मणा धबाले, अनिल बेळगावकर, मष्णू चोपडे, शिवस्मारक ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य बी. बी. पाटील, पुंडलिक पाटील (करंबळ) यांच्यासह प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुधीर पाटील, भालचंद्र पाटील आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पिराजी कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले. चित्रकला व हस्तकला स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या ज्योत्स्ना हंगीरगेकर हिचाही विशेष सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि शालेय उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शाळेमध्ये एकूण चित्रकला व हस्तकला स्पर्धेमध्ये 170 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यामध्ये चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक रोशन अशोक सुतार कुद्रेमनी आणि हायस्कूल विकी विक्रम पाटील मुतगे, अवनी जाधव मराठी विद्यानिकेतन बेळगाव यांनी पटकावला. तर हस्तकला स्पर्धेत अनुक्रमे श्रुती गोपाळ बामणे, गोजगे, स्नेहल भा पाटील मंडोळी व अक्षता तोरगल चापगाव हायस्कूल या विद्यार्थ्यांनी पटकावला.
सूत्रसंचालन : सहशिक्षक तुकाराम सनदी यांनी केले.