चापगाव /प्रतिनिधी :
1 फेब्रुवारी हा चापगाव सरकारी हायर प्राथमिक मराठी शाळेचा स्थापना दिवस आहे. शाळेची स्थापना 1 फेब्रुवारी 1926 रोजी झाली होती. त्या घडीला रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शतक महोत्सवाच्या निमित्ताने खानापूर लाईव्ह न्युज चे संपादक, पत्रकार तथा शाळेचे माजी विद्यार्थी पिराजी कुऱ्हाडे यांनी शाळेच्या आठवणीचा उजाळा देणारी ” आठवणीचे विश्व ” स्मरणिका संपादित केली आहे. या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा स्थापना दिनाचे औचित साधून येत्या 1 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
चापगाव येथील श्री दुर्गादेवी समुदाय भवनात रविवार दि. 1 रोजी सकाळी 9 वाजता या स्मरणिकेचे प्रकाशन आयोजीत करण्यात आले आहे. तसेच सकाळी 11 वाजता खानापूर येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी, तालुक्यातील महणीय व्यक्ती तथा गावातील प्रतिष्ठित मंडळींना तसेच स्मरणिकेत जाहिरात देऊन सहकार्य केलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी सार्वजनिकानी व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून उपकृत करावे असे आवाहन स्मरणिकेचे संपादक पिराजी कुऱ्हाडे यांनी केले आहे.
आठवणीचे विश्व या स्मरणिकेत मराठी प्राथमिक शाळेच्या स्थापनेसाठी योगदान दिलेल्या महनिय व्यक्ती शाळेच्या इमारतीसाठी परिश्रम, शाळेच्या जडणघडणीत कार्य केलेले आजी-माजी शिक्षक वृंद, या शाळेने घडविलेले माजी विद्यार्थी, तसेच कवितांचा संच. व चापगाव,अल्लेहोळ, वड्डेबैल व शिवोली गावातील रितीरिवाजाची संक्षिप्त माहिती या पुस्तिकेत संकलित करण्यात आली आहे. तरी शाळेच्या माजी विद्यार्थी व निमंत्रित आणि उपस्थित राहून या प्रकाशन सोहळ्यात वंदनीय उपस्थिती दर्शवावी ही नम्र विनंती.
संपादकांचे मनोगत :
शंभर वर्षाची शाळा: एक गावचे वैभव:
खरंतर, चापगाव येथील सरकारी हायर प्राथमिक मराठी शाळेने हजारो विद्यार्थ्यांना घडवलं. या शाळेचा आज जन्मदिन. शाळेने आम्हाला मातीच्या गोळ्यापासून मानव म्हणून घडवण्यासाठी आई-वडिलांनंतर गुरुजनाने घडविले. आपली मराठी शाळा म्हणजे आम्हा सुशिक्षिततांचा आत्मा आहे. जडणघडणीचे पाऊल आहे. म्हणून या शाळेच्या जन्मदिनाचे अवचित साधून आठवणीचे विश्व ही स्मरणिका प्रकाशित करत आहोत. या स्मरणिकेत जुन्या आठवणी, शाळेच्या भौतिक गोष्टी, स्थापनेपासून आतापर्यंत शाळेच्या प्रगतीसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठांसह आजी-माजी विद्यार्थ्यांची थोडक्यात ओळख, व शब्दांची पेरणी, अक्षराची काव्यपंक्ती, तसेच चापगाव, अल्लेहोळ, वड्डेबैल, शिवोली, गावांची ओळख व संस्कृतीचा वसा या पुस्तिकेत संक्षिप्तरित्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

