खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
खानापूर तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याची दखल घेऊन ज्या जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यास प्राधान्य द्यावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर तालुक्यातील माचीगड, अनगडी, पडलवाडी, हलसाल, जटगे, करंजाळ, घोसे के एच, घोसे बी, के व कापोली येथील सरकारी मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच सरकारी मराठी शाळांना कोणत्या समस्या आहेत याची माहिती घेण्यात आली. शैक्षणिक साहित्य वितरण करीत असताना अनेक शाळा अतिथी शिक्षकांवर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे तर काही शाळांमध्ये एकच शिक्षक उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे त्यामुळे शिक्षण खाते व लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन तातडिने सरकारी शाळामधील समस्या दूर कराव्यात अशी मागणी गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांच्याशी संपर्क साधून करण्यात आली.
प्रारंभी माचीगड येथील सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीएलडी बँकेचे संचालक नारायण पाटील होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खानापूर तालुका समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी बेळगाव युवा समितीतर्फे मराठी शाळांच्या संवर्धनासाठी घेण्यात आलेला उपक्रम अतिशय चांगला असून याला सर्वांनी हातभार लावला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समिती खारीचा वाटा उचलत आहे तसेच येणाऱ्या काळात मराठी शाळांच्या विकासासाठी अधिक प्रमाणात प्रयत्न केले जातील असे मदत केल्या. सर चिटणीस आबासाहेब दळवी, मिलिंद देसाई यांनी युवा समितीच्या उपक्रमांची माहिती देत लवकरच मराठी शाळांच्या समस्या सोडाव्यात यासाठी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली जाईल अशी माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापक कोटी विलास देसाई, बाळा देसाई, एस आर सुतार,व्हि जे मेत्री, के एम पेंढारी, एस बि पाटील, एम एस आयत्ती कापोली शाळेचे मुख्याध्यापक एस के शिंदे, महेश लाटगावकर एन एन चोपडे, आर एन निंबाळकर, नेताजी देसाई अमृत देसाई, प्रकाश देसाई, गोविंद पाटील यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.