

खानापूर लाईव्ह न्युज: (ईश्वर बोबाटे )
जांबोटी-कणकुंबी-बैलूर विभाग दिव्यांग (अपंग) संघ, जांबोटी या परोपकारी व सेवाभावी संस्थेला येत्या फेब्रुवारी महिन्यात 36 वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून संस्थेचा त्रितपपूर्ती सोहळा विविध विधायक उपक्रम राबवून भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. तालुक्यातील निराधार दिव्यांगांना मायेचा आधार देण्यासाठी हक्काचे छत असावे या उद्देशाने जांबोटीत दिव्यांग सेवा मंदिराची उभारणी करण्याचा संकल्प सोडण्यात आला असून सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असणाऱ्या या पवित्र कार्याला दानशुरांनी हातभार लावावा असे आवाहन संस्थापक एस. जी. शिंदे यांनी केले.
ते म्हणाले, दिव्यांगांना आधार देण्याबरोबरच दिव्यांग वेतन मंजुरी, व्हीलचेअर व आवश्यक साहित्याचे वितरण याबरोबरच स्वावलंबनाचा संस्कार रुजवण्यासाठी संस्था कार्य करत आहे. नुकताच खानापूर व बेळगाव तालुका मर्यादित “गजर हरिनामाचा” संगीत भजन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. संस्थेच्या त्रितपपूर्ती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यासाठी अत्यावश्यक असलेले दिव्यांग सेवा मंदिर उभारणीचा संकल्प कार्यकारी मंडळाने सोडला आहे. 7 फेब्रुवारी 1988 रोजी संस्थेची स्थापना झाली. पहिल्या वर्षी अपंग लोकांना शासकीय अर्थसहाय्य (पेन्शन) मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम केले. यासाठी बेळगांव जिल्हा इस्पितळाचे अस्थितज्ञ डॉ. एच. बी. पाटील व खानापूर येथील उज्वला फोटो स्टुडिओचे मालक रमेश उरणकर यांचे सहकार्य मोलाचे ठरले. पहिल्याच प्रयत्नात 157 अपंगाना वैद्यकीय प्रमाणपत्रे व शासकीय मदत मिळवून दिली. संस्थेची सामाजिक बांधिलकी बघून सीए श्रीशैल उप्पीन यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचे एकूण 32 वर्षाचे ऑडीट मोफत करुन दिले. त्याशिवाय दरवर्षी त्यांनी 1 हजार रुपयांची रोख देणगीही दिली. सध्या सी. ए. शिवकुमार होंदडकट्टी यांनी मागील 3 वर्षाचे ऑडीट मोफत करुन दिले आहे. तसेच यापुढचे ऑडीटचे काम व इतर कामे मोफत करुन देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यांनी यावर्षी 5001 रुपयांची रोख देणगी दिली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
ॲड मदन देशपांडे, डॉ. आर. एस. हारवाडेकर, डॉ. डी. पी. वागळे, जुनेद तोपिनकट्टी आदिंनी सहकार्याचा हातभार लावला आहे. अपंगांना उपयुक्त अशी व्हीलचेअर्स, तीनचाकी सायकल, शिलाई यंत्रे, कुबड्या व इतर उपकरणे देऊन अपंगांना समाजात वावरण्याची संधी दिली.
जांबोटी येथील सौ. रेश्मा राजू पाटील यांनी एकवर्षी सर्व अपंगांना चादरी, एकवर्षी कपडे व एकवर्षी भांडी दिली आहेत. लोककल्प फौंडेशनतर्फे 2022 मध्ये 200 अपंगांना ब्लॅंकेटसचे वितरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बेळगांवतर्फे 2023 मध्ये 150 अपंगांना जमखानांचे वाटप करण्यात आले. संघटनेची व्याप्ती तालुकाभर करण्यात आल्याने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून 3 डिसेंबर 2023 रोजी शिवाजीनगर, खानापूर येथे खानापूर तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्रितपपूर्ती सोहळ्यानिमित्त गेल्या 36 वर्षाच्या कार्याचा आढावा घेणारी “परोपकार” ही स्मरणिका प्रसिध्द केली जाणार आहे. या स्मरणिकेत हितचिंतकांनी जाहिराती देऊन सहकार्य करावे असे आवाहन शिंदे यांनी केले.
देणगी देऊ इच्छिणाऱ्यांनी जांबोटी येथील कर्नाटक विकास ग्रामिण बँकेच्या खाते क्रमांक 17032011546 (IFSC Code : केव्हीजीबी 0002606) या खाते क्रमांकावर देणगी रक्कम व स्मरणिकेच्या जाहिरातीची रक्कम जमा करावी. संस्थेचे सेक्रेटरी श्री. रमेश गावडे यांच्या मोबाईल क्रमांक 8105206509 या क्रमांकावर फोन पे द्वारे देणगी किंवा जाहिरातीची रक्कम जमा करु शकता. अधिक माहितीसाठी संस्थेचे संस्थापक श्री. एस. जी. शिंदे (मोबाईल क्रमांक : 9964365795) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. यावेळी के. व्ही. जी. बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक विठ्ठल वेताळ व अन्य उपस्थित होते.
संपूर्ण तालुक्याचा अभ्यास केल्यानंतर खानापूर तालुक्यात जवळजवळ 60 अपंग निराधार असल्याचे निदर्शनास आले. काही अपंगांचे आईवडील आहेत, पण आमच्यानंतर आमच्या अपंग मुलामुलींचे पुढे कसे होणार, याची काळजी त्यांना लागून राहिली आहे. अशा अपंगांसाठी तसेच अनाथ मुले, मुली व कुणाचाही आधार नसलेल्या वृध्दांसाठी कायमचे निवास प्राप्त करुन द्यावे, या उदात्त हेतूने दिव्यांग सेवा मंदिर उभारण्याचा संस्थेने संकल्प आहे. याची पहिली पायरी म्हणून 3 लाख रुपये अॅडव्हान्स देऊन जमीन खरेदीचा व्यवहार करण्यात आला आहे. खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची गरज आहे. तरी दानशूर नागरिक व संस्थांनी या विधायक व परोपकारी कार्याला मदत करावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. खानापूर व जांबोटी येथील कार्यालयात देणगी देऊ शकता. गोरगरीब व मोलमजुरी करणाऱ्या जनतेकडूनसुध्दा 5, 10 रुपयांची मदत मिळावी. त्यांचाही यात सहभाग लाभावा, यासाठी खानापूर येथील संपर्क कार्यालयात धर्मादाय पेटी ठेवली आहे.
