- तेलंगणा: लग्न म्हटलं की रुसवे-फुगवे, मानापमान होत असतातच, कधी घेण्यादेण्यावरून वाजतं, तर कधी जेवणावरून वाद होतो. पण काही दिवसांपूर्वी तेलंगणमध्ये वराकडचे लोक आणि वधूकडची मंडळी यांच्यादरम्यान अशा गोष्टीवरून महायुद्ध झालं, ज्याबद्दल कोणी विचारच करू शकणार नाही. त्या भांडणामागचं कारण ऐकाल तर तुम्हीही हैराण व्हाल. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण जेवणात फक्त मटण नल्ली मिळाली नाही म्हणून वरात घेऊन आलेले सगळे इतके चिडले की वराकडच्या लोकांनी सरळ लग्नच मोडलं आणि वधूला न घेता वरात तशीच परत गेली,
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाची मिरवणूक तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातून निजामाबादला पोहोचली होती. लग्नात मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते, सगळं काही ठीक होतं. पण मटण नल्ली न मिळाल्याने लग्नात आलेल्या पाहुण्यांनी अचानक गोंधळ सुरू केला. हा वाद इतका वाढला की मुलाच्या कुटुंबियांनी थेट लग्न मोडण्याचाच निर्णय घेतला.
- मटण नल्ली मिळाली म्हणून वन्हाडी झाले नाराज : लग्नात आलेल्या पाहुण्यांचा आरोप आहे की, त्यांना जेवणात मटण नल्ली देण्यात आली नाही. त्यामुळे वधूकडची मंडळी आणि वराकडचे नातेवाईक यांच्यात भांडणं सुरू झाली. हा वाद एवढा वाढला की ते प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहोचले, पोलीस अधिकाऱ्यांनी वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांना मटण नल्ली न दिल्याने अपमान केला आहे, असे सांगून वराकडील मंडळी लग्न मोडण्यावर ठाम राहिली.
- पण मुलाच्या कुटुंबीयांनी आम्हाला याबाबत आधी काहीच माहिती दिली नव्हती, असा युक्तिवाद वधूच्या बाजूने करण्यात आला. या कारणास्तव त्यांनी मांसाहारी जेवणामध्ये मटण नल्लीचा समावेश केला नाही. पण जेवणात मटण नल्ली मिळाली की नाही, या एवढ्याशा छोट्या मुद्यावरून कोणी लग्न कसं मोडू शकतं, या विचाराने पोलीस आणि स्थानिक लोक आश्चर्यचकित झाले. मात्र, बरीच समज देऊनही वराकडच्या लोकांनी काहीच ऐकलं नाही आणि ते वधूला न घेताच घरी परत गेले.अजब मागणीवरून लग्न मोडण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही असाच वाद उत्तरप्रदेशातील बागपतमधून समोर आला होता, तेव्हा मटर पनीरची भाजी न मिळाल्याने वराच्या काकाला राग आला होता. यानंतर लग्नात एवढा गदारोळ झाला की काही वेळातच वातावरण युद्धभूमीत बदलले.