खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात खानापूर तालुक्यातील विविध दलित संघटनेच्या वतीने हलगी मोर्चा काढण्यात आला. व अमित शहा यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
खानापूर येथील शिवस्मारक चौकात शुक्रवारी हलगी मोर्चा काढण्यात आला खानापूर तालुक्यातील विविध दलित संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी तालुका दलित महासंघ, दलित संघर्ष समिती, दलित युवा समिती, भीम सेना अशा विविध संघटना एकत्रित येऊन हा निषेध व्यक्त केला. यावेळी दलित महासंघाचे नेते व नगरसेवक लक्ष्मण मादार, भीमसेना तालुका अध्यक्ष मल्लेशी पोळ राजशेखर हिंडलगी, राघवेंद्र तलवार, शिवाजी मादार, उमेश कोलकार संगीता कदम, परशराम मादार, यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. येथील शिवस्मारक चौकात साखळी उपोषण करून घोषणाबाजी करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना त्याच ठिकाणी बोलावून निवेदन देण्यात आले.
यावेळी दलित संघटनेचे नेते राजशेखर हिंडलगी म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी देशाला केवळ संविधानच दिले नाही तर सर्व जाती-धर्मातील जनतेला जगण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यांना त्यांच्या अधिकार आणि हक्कांची जाणिव करून दिली आहे. असे असतांना गृहमंत्री बेताल वक्तव्य करून मनुस्मृतीचे जाहीरपणे समर्थन करतात. त्यांना त्या पदावर राहणाच्या नैतीक अधिकार नाही. त्यांना तात्काळ पायउतार करावे.
नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी अमित शहा यांचा निषेध करून भाजपने आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आणि संविधानाचा तिरस्कार केला आहे. आता तर अमित शहा यांनी जाहीरपणे त्याची वाच्यता केली असून या भाजप सरकारला संसदेबाहेर हलकण्याची वेळ आली आहे. जर अमित शहांना तात्काळ पायउतार न केल्यास देशातील डॉ. आंबेडकरप्रेमी पेठून उठतील, अशा इशारा दिला