चापगाव/ प्रतिनिधी: चापगाव व परिसरात बुधवारी दुपारच्या दरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच हैदोस घातला.कुत्र्याने जवळपास सात ते आठ जणांना गंभीर जखमी केले आहे. यामध्ये चापगाव मधील दोन ते तीन व अल्लेहोळ मधील दोन ते तीन लोकांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खानापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर पिसाळलेला कुत्रा दोन दिवसापासून चापगाव परिसरात वावरत होता. दोन दिवसांपूर्वी बस स्थानकावर काही कुत्र्यांना त्या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. पुन्हा तो कुत्रा बुधवारी दुपारच्या दरम्यान चापगाव बस स्थानक परिसर व अल्लेहोल परिसरात शिरल्याने वाटेत आलेल्या सर्वांनाच चावा घेत सुटला, यामध्ये दोन महिला एक पुरुष व एक मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांना तातडीने खानापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी गावातील वीस ते पंचवीस मुलांनी एकत्रित येऊन जंग जंग पिछाडले व त्याचा खात्मा केला.
चापगाव परिसरात गेल्या सहा महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने घातलेला हा दुसऱ्यांदा हरिदोष आहे. सहा महिन्यापूर्वी गुरुवारच्या चापगाव येथील बाजारपेठेत अचानकपणे पिसाळलेल्या कुत्र्याने प्रवेश करून अनेकांचा चावा घेतला होता त्याच कुत्र्याने अनेक ठिकाणी इतर कुत्र्यांना जखमी केले होते. त्यापैकीच काही कुत्र्यांना त्याची इजा होऊन पिसाळली जात आहेत त्यामुळे सावध राहणे गरजेचे बनले आहे.