
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: आंबे काढताना फांदी तुटल्याने झाडावरुन पडून एका उद्योजकाचा मृत्यू झाला. भांबार्डा (ता. खानापूर) गावाजवळील शिवारात बुधवारी (दि. ७) दुपारी तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रवळनाथ नारायण गुरव (वय ४५, मूळ गाव मेंढेगाळी ता. खानापूर, सध्या रा. शिवणे, पुणे) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नातेवाईकांच्या लग्नासाठी रवळनाथ कुटुंबियांसह पुण्याहून गावी आले होते. बुधवारी हलशी-भांबार्डाजवळील आपल्या शेतातील आंबे काढण्यासाठी ते गेले होते. झाडावर चढून आंबे काढत असताना पायातील फांदी तुटल्याने ते खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. लागलीच त्यांना हलशीतील दवाखान्यात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तथापि डोकीत रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा शिवणे-पुणे येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.
याबाबत नंदगड पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. आज गुरुवारी सकाळी उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे