IMG-20260226-WA0006


कालमनी (फोटो- चोरट्यांनी अशाप्रकारे सुनील चिगुळकर यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले आहे.
जांबोटी /वार्ताहर
कालमनी ता खानापूर येथे मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी बंद घराचा कडी कोयंडा तोडून 20000 रुपये रोख रक्कम तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की कालमणी येथील रहिवासी व कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक पत्रकार सुनील चिगुळकर यांचे कालमणी- आमटे रस्त्यावर स्वतःचे घर आहे .ते गेल्या चार-पाच महिन्यापासून मुलांच्या शिक्षणानिमित्त पीरणवाडी येथे वास्तव्यास असल्यामुळे ,त्यांचे घर कायम बंदच असते. सुनील चिगुळकर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या घरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवली असून, ती आपल्या मोबाईल मध्ये जोडल्यामुळे रोज त्यांचे सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून घराकडे लक्ष असते. मंगळवारी कालमणी गावांमध्ये प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन असल्यामुळे ,सर्वजण कार्यक्रमात व्यस्त असल्याची संधी साधून, अज्ञात चोरट्यांनी सुनील चिगुळकर यांच्या घराच्या समोरील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून ,घरातील तिन्ही खोल्यांचे बंद दरवाजांचे कुलूप तोडून तिजोरी व कपाटातील संसार उपयोगी साहित्य अस्तव्यस्त करून, रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला ,यावेळी चोरट्यांना तिजोरी मध्ये ठेवलेली 20000 रोख रक्कम तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर व इतर किमती वस्तू लंपास केल्या आहेत. बुधवारी सकाळी सुनील चिगुळकर यांनी आपल्या मोबाईल मधून घरातील सीसीटीव्ही यंत्रणा तपासून पाहिली असता सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संशयाने लागलीच आपल्या पुतण्याला फोन करून घराकडे जाऊन पाहण्यास सांगितले असता ,सदर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चोरीची माहिती जांबोटी आऊट पोस्टचे पोलीस हवालदार बाहुबली यांना कळविण्यात आली ,त्यांनी लागलीच घटनास्थळी पाहणी करून सदर माहिती खानापूर पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर खानापूर पोलीस निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तातडीने बेळगाव येथून श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण केले. यावेळी श्वानाने घरापासून कालमनी -आमटे रस्त्यावर 300 मीटर पर्यंत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करून ते तेथेच घुटमळले .तसेच ठसे तज्ञांच्या मते चोरटे सराईत गुन्हेगार असून त्यांनी तोंडाला मास्क व ह्यडगलोज परिधान केल्याचे समजते .
कालमणी येथे घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे जांबोटी भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांनी त्वरित , चोरीच्या घटनेचा छडा लावून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us