बेळगाव: खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या महाशक्ती प्रमुख बुथ प्रमुख सह मुख्य पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बेळगाव येथील धर्मनाथ भवन मध्ये आज दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची मते आजमावली जाणार आहेत. त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील 255 बुथ मधून उपस्थित असलेल्या शक्ती प्रमुख, महाशक्ती प्रमुख व बूथ पदाधिकाऱ्यांची मते आजमावून गुपित मतदान घेण्यात येणार असल्याचे कळते. यासाठी खानापूर तालुक्यातील प्रत्येक बूथ प्रमुखांना व अपेक्षित कार्यकर्त्यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव येथे होणाऱ्या भाजपच्या बैठकीकडे खानापूर तालुक्यातील अनेकांचे लक्ष वेधले आहे.
खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीतून चार ते पाच जण इच्छुक आहेत. प्रत्येकाने आपल्या परीने कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचून मत याचनाही केली आहे. प्रत्येक इच्छुक हा जनसंपर्कातही आहे. त्यामुळे उमेदवारी योग्य व्यक्तीलाच मिळाली पाहिजे अशी मागणी ही सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून होत आहे. यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठांनी अनेक गुपित सर्वेही केले आहेत. उमेदवारी कोणाला द्यावी याचेही निदान भाजपचे वरिष्ठ तसेच संघाच्या प्रमुखांनी केले आहे. पण आज बेळगाव येथे खानापूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून मतदान प्रक्रियेद्वारे मते आजमावण्याची नामी शक्कल जिल्ह्यातील वरिष्ठांनी घेतली आहे. अपेक्षित कार्यकर्त्याकडून झालेले मतदान हे केवळ औपचारिक मतदान असेल, उमेदवार निवडीचा अधिकार हा वरिष्ठांच्याकडेच राहणार आहे.त्यामुळे मते आजमावण्याचा फार्स केवळ इच्छुकांच्यात धूळफेक करणारा तरी ठरणार नाही ना? असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यातून व्यक्त केला जात आहे.