- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी: मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे. २००६ पासून आजपर्यंत कर्नाटक शासनाने हिवाळी अधिवेशन बेळगांव मध्ये भरवून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी व सर्वोच्च न्यायालयातील अंतिम टप्प्यामध्ये असणार्या सीमाप्रश्नाला बळकटी येण्यासाठी समस्त मराठी बंधू भगिनींने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सीमा महामेळावा यशस्वी करावा असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने केले आहे. यासाठी आज शुक्रवारी रोजी जांबोटी येथे महामेळाव्याची जनजागृती करण्यासाठी तालुका पंचायचे माजी सभापती मारूतीराव परमेकर, जांबोटी विभाग म ए समितीचे उपाध्यक्ष माजी जि पं. सदस्य जयराम देसाई, म ए समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, मध्यवर्ती म ए समितीचे सदस्य गोपाळराव पाटील व रविंद्र शिंदे, समितीनेते लक्ष्मणराव कसरलेकर, कृष्णा देसाई, प्रभाकर बिर्जे, विलास देसाई, वसंत कळ्ळेकर, शंकर सडेकर, आण्णासाहेब कुडतुरकर, शिवाजी पाटील, शंकर चिखलकर, प्रल्हाद कोडचवाडकर, विठ्ठल देसाई, विठ्ठल राजगोळकर आणि मारुती कांबळे इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते, या ठिकाणी कोपरा सभा झाली. या सभेमध्ये माजी सभापती मारुती परमेकर व माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई यांनी जांबोटी विभागातून महामेळाव्याला बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून यशस्वी करू असे आश्वासन दिले. यावेळी महामेळाव्याच्या जनजागृती करीता जांबोटी येथील छत्रपती शिवाजी चौक आणि बाजारपेठ येथे पत्रके वाटण्यात आली.