खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
जिद्द, अपार, मेहनत, परिश्रम, सातत्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात, अशाच पद्धतीने कणकुंबी येथील एका ध्येयवेड्या नाट्यकलाकाराने कणकुंबी, गोवा ते मुंबई राज्यपातळीवरील नाट्यमहोत्सवात पोहोचून कणकुंबीचे नाव उज्ज्वल केले आहे. अशाच प्रकारे बेळगाव येथे झालेल्या श्री गणेश फेस्टिवल 2024 कार्यक्रमात पुन्हा नाटक भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कणकुंबी येथील गोविंद उर्फ तात्या लक्ष्मण गावडे यांनी बेळगाव येथे श्री माता सोसायटीच्या सभागृहात श्री गणेश फेस्टिवल 2024 या कार्यक्रमाची शुक्रवारी सांगता झाली. यावेळी जिल्ह्यातील नवरत्नांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कणकुंडी येथील गोविंद उर्फ तात्या लक्ष्मण गावडे यांची निवड करण्यात आली होती. कणकुंबी गावातील नाट्यपरंपरा आणि येथील नाट्य कलाकार यांचा विचार केला तर संगीत भजन आणि नाटकं ही कला काही युवकांच्या अंगी उपजतच असते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. २००७ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्याबरोबर गोविंद गावडे याने नाट्य अभिनय क्षेत्रात पदार्पण करून आपल्या अंगी असलेल्या अभिनयाची छाप उमटवली. दरवर्षी शिमगा, होळी, हनुमान जयंती किंवा दत्त जयंती अशा विविध उत्सवामधील होणाऱ्या जवळपास ४० नाटकांमध्ये भाग घेऊन नाट्य अभिनय जोपासला आहे. यामध्ये शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रमुख भूमिका केल्या आहेत.
विशेषतः ऐतिहासिक, पौराणिक, काल्पनिक व सामाजिक अशा विविध ४० नाटकांमध्ये भाग घेऊन प्रमुख भूमिका बजावलेला युवक गोविंद उर्फ तात्या गावडे आपल्या अभिनयाची छाप त्याने गोव्यापर्यंत उमटविली. गोव्यातील अनेक ठिकाणी नाट्य कलामंच यांच्यावतीने अशा कलाकारांचा शोध घेऊन प्राधान्य दिले जाते. गोविंद गावडे याने गोव्यातील नाट्य मंडळांच्या अनेक ऐतिहासिक, काल्पनिक, सामाजिक व पौराणिक अशा नाटकात वेगवेगळ्या भूमिका करून गोव्याच्या रंगमंचावरसुद्धा अभिनयाची छाप पाडली.शिवाजी महाराज कला पुरस्कार प्रतिष्ठान आणि कला सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई दादर येथे श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले होते. अशाच प्रकारे बेळगाव येथे झालेल्या या कार्यक्रमातही त्यांचा नाट्यभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.