हलकर्णी ग्रामपंचायतीच्या कारभारावर तीव्र नाराजी

फोटो : गांधीनगर : वकिलांना कचऱ्याच्या ढिगासमोरून नाक धरून ये-जा करावी लागत आहे.

खानापूर :

खानापूर-बेळगाव शहरांतर्गत महामार्गावरील गांधीनगर आणि न्यायालय परिसरात कचऱ्याच्या ढिगांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. विद्यार्थी आणि वकिलांना नाक धरून ये-जा करावी लागत आहे. संततधार पावसामुळे दिवसाही डासांचा उपद्रव वाढला असून रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसात येथील कचऱ्याचे ढीग न हटवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी यांनी दिला आहे.
कचऱ्याच्या समस्येने विद्यार्थी, वकील आणि येथील रहिवासीही हैराण झाले आहेत. बस थांबा, न्यायालय, सरकारी वाचनालय, केएलई महाविद्यालय, टी स्टॉल आणि हॉटेल असल्याने येथे उघड्यावर कचरा टाकण्यावर निर्बंध लादणे आवश्यक आहे. वकीलवर्ग व विविध कामानिमित्त न्यायालयात येणारे लोक चहा नाश्त्यासाठी बाजूलाच असलेल्या रेस्टॉरंट व चहा टपरींवर जातात. कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे त्यांच्या आरोग्याची समस्या उद्भवत आहे. याबाबत दै. पुढारीतून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हिंदू नगर क्राॅसच्या ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले होते. तथापि न्यायालया जवळील बस थांबा परिसरात असलेले कचऱ्याचे तसेच ठेवण्यात आल्याने पुन्हा दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. केएलई महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि वकिलांना नाक धरून ये-जा करावी लागत आहे.


याबाबत वकिलांनी येथील अस्वच्छतेची पाहणी करून तालुका पंचायत व जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी ॲड अरुण सरदेसाई, प्रकाश बाळेकुंद्री, एस. के. नंदगडी, व्ही. एन. पाटील, जी. एम. देसाई, आर. एन. पाटील, आनंद देसाई, मारुती कदम, एच. एन. देसाई, केशव कळ्ळेकर आदी उपस्थित होते.

नोटीस बजावणार!

न्यायालय परिसरातील कचऱ्याचे ढीग आणि त्यामुळे पसरलेल्या अस्वच्छतेमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल हलकर्णी ग्रामपंचायतीच्या पीडिओंना अनेक वेळा सूचना दिल्या आहेत. वारंवार कळवूनही अधिकाऱ्यांकडून अक्षम्य दुर्लक्ष करण्यात येत आहे. डेंगूचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार महागात पडू शकतो. वेळीच कार्यवाही न झाल्यास अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे अध्यक्ष ईश्वर ॲड. घाडी यांनी सांगितले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us