चापगाव /प्रतिनिधी:
सार्वजनिक बांधकाम खाते अंतर्गत येणाऱ्या येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टँड चापगाव परिसराच्या तिन्ही बाजूंनी येणाऱ्या रस्त्यांच्या 300 मीटर रस्ता विकास कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते अंतर्गत या रस्त्याचे डांबरीकरण हाती घेण्यात आले असून यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी हाती घेतलेल्या या कामाबद्दल ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते अंतर्गत चापगाव बस स्टँड सर्कलला तिन्ही बाजूंनी रस्ते येतात. यामध्ये चापगाव ते लालवाडी, चापगाव ते कोडचवाढ आणि चापगाव ते यडोगा हे तिन्ही रस्ते सार्वजनिक बांधकाम खाते विभागातील आहेत. यापैकी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून वड्डेबैल कडे 150 मीटर व त्यापुढे अति खराब झालेल्या ठिकाणी 150 मीटर तर यडोगा रस्त्याशी जोडणाऱ्या जळगा रोड कडे 300 मीटर रस्त्याचे डांबरीकरण हाती घेण्यात आले आहे. गावच्या प्रमुख चौकात तिन्ही बाजूंनी रस्त्याची दुरावस्था झाली होती. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी खड्डे पडून पुतळ्याच्या दुतर्फा चिखल झाला होता. या संदर्भात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे वारंवार विनंती करण्यात आली होती. यानुसार यावर्षी पूरग्रस्त निधीतून मंजूर झालेल्या निधीतून आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या सूचनेनुसार प्राथमिक टप्प्यात चापगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाच्या दुतर्फा रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. सदर कामाला गेल्या दोन दिवसापासून प्रत्यक्षात सुरुवात झाली असून डांबरीकरण हाती घेतले जाणार आहे. या ठिकाणी चिखलाचे व धुळीचे साम्राज दूर होणार आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल ग्रामस्थातून अभिनंदन होत आहे.
यावेळी खानापूर लाईव्ह शी बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खाते अंतर्गत रस्त्यांच्या डागडूजी साठी तालुक्यात 80 किलोमीटर ची कामे हाती घेण्यात येणार आहेत. दरवर्षी या डागडुजीच्या निधीतून ठिकठिकाणी खड्डे मुजवण्याचे काम हाती घेतले जात होते. पण आम्ही यासाठी ज्या ठिकाणी अति आवश्यक व गावच्या विशेष रस्ता खराब झाला आहे. अशा रहदारीच्या ठिकाणी पक्का रस्ता करण्याचे सूचना संबंधित विभागाला केली असल्याचे सांगितले. शिवाय चापगाव, लालवाडी या रस्त्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच याही रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक टप्प्यात चापगाव शिवाजी चौकाच्या दुथर्फा 300 मीटर रस्त्याची डांबरीकरण हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.