खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: खानापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या अशोका येथील श्री रामलिंगेश्वर मंदिर कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रेल्वे विभागाने आता भुयारी रेल्वे पूलाचा मार्ग काढण्यासाठी निधीची तरतूद केली असून सदर रेल्वे भुयारी पुलाच्या कामाचा शुभारंभ उद्या मंगळवार दि. 15 रोजी खासदार विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी आमदार विठ्ठल हलगेकर सह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी दिली आहे.
असोगा येथील श्री रामलिंगेश्वर मंदिरासह असोगा मनतूर्गा सह भोसगाळी आधी गावा गावांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर रेल्वे फाटक असल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसते. यामुळे या ठिकाणी भुयारी पूल कडून रस्ता निर्माण करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. यासंदर्भात अनेक वेळा दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडे अर्ज विनंती करूनही याची अंमलबजावणी झाली नाही. अलीकडे मिरज लोंढा मार्गाचा विस्तार व विकास होत असताना ठीक ठिकाणी भुयारी पूल निर्मिती करून मार्ग काढण्यासाठी रेल्वे विभागाने क्रम घेतले आहेत. यानुसार अति महत्त्वाचा व अधिक रहदारीचा असलेला खानापूर हेमडगा मार्गावरील भुयारी रेल्वे पुलाचे काम प्रगती पथावर आहे. त्याचप्रमाणे खानापूर असोगा मार्गावरील या भुयारी पूल व रस्त्याच्या कामासाठी १६ कोटीचा निधी रेल्वे विभागाकडून मंजूर करण्यात आला असून याचा आता शुभारंभ होत असल्याने या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.