IMG-20260216-WA0057


खानापूर: येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र सरकारचे राज्य मराठी विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.२२) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंडळच्या ताराराणी हायस्कूलमध्ये होणाऱ्या या परीक्षेला खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राज्य मराठी विकास संस्थेचे सदस्य नारायण कापोलकर यांनी केले आहे.


दोन्ही संस्थांच्यावतीने दरवर्षी खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. प्राथमिक विभागात इयत्ता सातवीपर्यंतचे तसेच माध्यमिक विभागात आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. सर्व विषयांचे मुलभूत ज्ञान, सामान्यज्ञान, बुध्दीमता आणि चालू घडामोडी आदी अभ्यासक्रम परीक्षेला राहणार आहेत. ५० बहूपर्यायी प्रश्नांसाठी १०० गुणांची ही परीक्षा असेल, असे प्रतिष्ठानने कळविले आहे.


विजेत्यांना प्राथमिक विभागासाठी रू. ३५००, रू. २५००, रू. २०००, रू. १५००, रू. १०००, रू. ८००, रू. ७००, रू. ५०० तसेच माध्यमिक विभागासाठी रू. ४०००, रू. ३०००, रू. २५००, रू. २०००, रू. १५००, रू. १२००, रू. १००० आणि रू ७०० अशी अनुक्रमे बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याशिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.

पालक-विद्यार्थी आणि शिक्षकांनी परीक्षार्थींची नावे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वाझ बिल्डींग मिनिविधान सौधसमोरील प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात नोंदवावीत, किंवा परीक्षा केंद्रावर सकाळी 8.30 वाजेपर्यंत नोंदवून परीक्षा देऊ शकता. असे आवाहन नारायण कापोलकर यांनी केले आहे.
प्रतिष्ठानच्यावतीने खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारणेसाठी प्रयत्न केले जात आहे. प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून त्याचे मूल्यामापन करण्याबरोबरच प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तोंडओळख व्हावी, हा उद्देश आहे. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या परीक्षांना तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याची माहिती श्री. कापोलकर यांनी दिली. यावर्षीही परीक्षेला उस्त्फूर्द प्रतिसाद लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Do Share
error: Content is protected !!
Call Us