खानापूर लाईव्ह न्युज प्रतिनिधी /हल्याळ:
उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील हल्याळ दांडेली जोयडा भागात आज रविवारी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा प्रचार दौरा झाला. या भागातील मराठा समाजासह सर्व भाषिक समाजाने उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून यावेळी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना निवडून आणण्याचा एकच नारा केला आहे. या भागाचे लोकनेते माजी मंत्री विद्यमान आमदार श्रीमान आर् व्हि. देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हल्याळ, दांडेली, जोयडा या भागात प्रचार दौरा झाला. यावेळी डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांचे तीनही ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. राजकारणात मुरब्बी असलेल्या श्रीमान आर व्ही. देशपांडे यांनी आपल्या भागातून उच्चांकी मतदान देणार असून लोकसभा मतदारसंघात हल्ल्याळ भागातील मतदान यावेळी काँग्रेसला अधिक राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून यावेळी खानापुरातून उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. डॉक्टर अंजलीताई निंबाळकर ह्या एक उच्च शिक्षित उमेदवार असून मागील पाच वर्षात विधानसभेमध्ये भाजप सरकार विरोधात अनेक वेळा आवाज उठवून समस्या मांडल्या आहेत. खानापूर तालुक्यातील आमदार म्हणून पाच वर्षे उत्तम सेवा बजावली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये गेल्या 25 वर्षात भाजपच्या हाती लोकसभेची सत्ता मिळाल्यानंतर या भागातील खासदारानी काय विकास केला, लोकांचा काय संपर्क ठेवला, याची जाणीव मतदारांना आहे. त्यामुळे भाजपला सर्वसामान्य जनता ओळखून आहे. यासाठी या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना उच्चांकी मतदान देऊन उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रातून लोकांनी निवडून देण्याचा यावेळी निश्चय केला आहे. आणि तो नक्कीच फळाला जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त करून आपल्या हल्ल्याळ विधानसभा मतदारसंघातून अधिकाधिक मतदान देऊन यावेळी उत्तर कन्नड लोकसभेत काँग्रेसला उच्चांकी मतदानाचा आकडा आपण देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री मंकाळू वैद्य , जिल्हाध्यक्ष साई गावकर यासह कारवार भागातील अनेक आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हल्याळ विधानसभा मतदारसंघातील हल्याळ, दांडेली, जोयडा तीनही भागात कन्नड बरोबर मराठी भाषिक अधिक आहेत. शिवाय मराठा मतदारही मोठ्या प्रमाणात असल्याने या भागातून डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांचे जल्लोषी स्वागत करून त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय व त्यांना निवडून आणण्याचा नारा यावेळी अनेक महिला वर्गासह कार्यकर्त्यांनी केला.