
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
आवडते मज मनापासून शाळा.. या कवितेच्या वक्तीप्रमाणे जरी आपण बालपणातील आठवण देणारी आपली आवडती शाळा सोडून कुठेही गेलो तरी त्या शाळेतील ते आठवणीतले दिवस, खोड्या मस्करी, शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या ज्ञानार्जना बरोबर केलेली मौजमजा याची आठवण ही वेगळीच असते. म्हणून माजी विद्यार्थ्यांनी आपले स्नेहबंधन राखून शाळेतील जुन्या आठवणीचा उजाळा देण्यासाठी केलेल्या सवंगड्यांचा स्नेह मेळावा हा अविस्मरणीय ठरतो. म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित वनश्री हायस्कूल हलगा,ता- खानापूर या ठिकाणी 2008- 2009 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आनंदात पार पडला.
तब्बल पंधरा वर्षानंतर पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांची शाळा भरली, या विद्यार्थ्यांच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा सुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष श्री विठ्ठल निंगाप्पा गुरव हे होते तसेच श्री महाबळेश्वर परशराम पाटील अध्यक्ष ग्रामपंचायत हलगा, श्री नानासाहेब पाटील, सौ रेणुका महादेव पाटील, प्रमुख वक्ते म्हणून श्री एस डी पाटील, प्रमुख अतिथी म्हणून श्री पी आर पाटील, मारुती बडकू पाटील डी.एम गुरव, नरसिंग फटाण, वामन सीमांनी सुतार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत नृत्यने कार्यक्रमाचे बहारदार अशी सुरुवात केली. तत्पूर्वी नेहमीप्रमाणे या विद्यार्थ्यांची प्रार्थना व हजेरी घेऊन माजी शिक्षकांचा तास घेण्यात आला.
यावेळी माजी विद्यार्थी प्रमुख अमित परशराम पाटील व तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याचबरोबर प्रतिमा पूजन माजी शिक्षक म्हणून उपस्थित असलेले निवृत्त मुख्याध्यापक टी.एल सुतार,मुख्याध्यापिका श्रीमती एस.आर रोटी मॅडम, शारीरिक शिक्षक एस.एल मासेकर, मुख्याध्यापक एस.एन सपाटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक एस.एन सपाटे सरांनी प्रास्ताविकेतून या कार्यक्रमाचा हेतू आणि उद्देश स्पष्ट करत माजी विद्यार्थ्यांचे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने माजी व आजी शिक्षकांचा सत्कार आयोजित करण्यात आला तसेच याप्रसंगी विशेष सत्कारमूर्ती म्हणून भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले महाबळेश्वर रामराव पाटील, निखिल मर्याप्पा पठाण, उमेश खांबले, ज्ञानेश्वर नानू पाटील, रामचंद्र कृष्णा पाटील, या सर्व माजी विद्यार्थ्यांचा भारतीय सैनिक म्हणून व्यासपीठावरती सन्मान व सत्कार करण्यात आला. यानंतर माजी शिक्षकांच्या वतीने मुख्याध्यापिका एस.आर रोटी यांनी व निवृत मुख्याध्यापक सुतार यांनी आपले विचार या माजी विद्यार्थी व्यक्त करताना आपल्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या बरोबर हितगुज साधली.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मंजुनाथ पठाण, स्नेहल मारुती पाटील, विद्या वसंत पाटील, अमित परशराम पाटील, यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करत आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मुख्याध्यापक पी आर पाटील सर यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असे कार्यक्रम आपल्याला प्रेरणा देतात आणि असे कार्यक्रम राबवले पाहिजेत असे नमूद केले. व्यासपीठावरून बोलताना महाबळेश्वर पाटील यांनी माजी विद्यार्थी या नात्याने शाळेच्या या अशा कार्यक्रमात वाव देण्यासाठी पाच हजार रुपयाची अशी भरघोस अशी देऊन,असे कार्यक्रम राबवले पाहिजेत आणि अशा कार्यक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक शाळेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली.
नानासाहेब पाटील तसेच डी.एम गुरव साहेब यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांशी हितगुजसाधत अशा पद्धतीच्या कार्यक्रमातून शाळेच्या सर्वांगीण विकाससाठी आपली मदत महत्त्वाची ठरते असे सांगितले. प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले मुख्याध्यापक श्रीमान एस. डी पाटील सर यांनी माजी विद्यार्थ्यांना उद्देशून मेळाव्याचा पाठीमागचा हेतू तसेच विद्यार्थ्यांनी शाळेसंदर्भातील अडीअडचणी जाणून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले माजी विद्यार्थी म्हणजे शाळेचा हा अविभाज्य घटक असतो शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी या विद्यार्थ्यांचे योगदान हे महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर आपल्या मराठी शाळा टिकवण्यासाठी सुद्धा आपण सर्वतोपरी प्रयत्न करावे असे सुद्धा त्यांनी सांगितले,
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ ही शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा जपणारी संस्था असून अशा संस्थेतील या शाळांचे विद्यार्थी सुद्धा अशा संस्कार मुळे व सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असतात असे ते बोलताना म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष विठ्ठल निंगाप्पा गुरव यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना धन्यवाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व शाळेबद्दलची आपली आपुलकी जिव्हाळा असाच कायम टिकून राहावा अशी सदिच्छा व्यक्त केली. आजी विद्यार्थ्यांच्या वतीने बहारदार असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक ए जे सावंत सर यांनी केले तर आभार सहशिक्षिका ए ए पाटील टीचर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेहभोजनाच्या कार्यक्रम अटपून सुंदर अशा या स्नेह मेळाव्याची सांगता करण्यात आली.