“पीएलडी बँकेचा कारभार नियमांनुसारच; राजकीय आकसापोटी आरोप करणे चुकीचे”
Oplus_16909312
हेडलाईन :
“पीएलडी बँकेचा कारभार नियमांनुसारच; राजकीय आकसापोटी आरोप करणे चुकीचे”
चेअरमन मुरलीधर पाटील यांचा घाडी यांच्या आरोपांना स्पष्ट शब्दांत पलटवार
खानापूर : प्रतिनिधी
खानापूर पीएलडी बँकेचा कारभार पारदर्शक व काटेकोरपणे सुरू असून, बँकेतील सर्व व्यवहार शासनाच्या नियमांनुसारच केले जातात. बँकेच्या कारभाराबाबत माजी संचालक घाडी यांनी केलेले आरोप हे राजकीय आकसातून करण्यात आले असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पीएलडी बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील यांनी स्पष्ट केले.
खानापूर पीएलडी बँकेच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर माजी संचालक घाडी यांनी बँकेच्या कारभारावर काही आरोप केले होते. या आरोपांना उत्तर देताना चेअरमन मुरलीधर पाटील यांनी बँकेची भूमिका स्पष्ट केली.
“बँकेचा व्यवहार हा शासनाच्या नियमांनुसारच चालतो. नाबार्ड तसेच राज्य शिखर बँकेकडून बँकेला निधी उपलब्ध करून दिला जातो. शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसारच कर्जाचे व्यवहार केले जातात. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवरून करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत,” असे पाटील यांनी सांगितले.
बँकेच्या वार्षिक बैठकीची नोटीस सभासदांना नियमानुसार वेळेत देण्यात येते. बैठकीत बँकेच्या कामकाजाचा अहवाल सभासदांसमोर मांडला जातो. त्यामुळे बँकेच्या व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“शेतकऱ्यांच्या हितासाठीच बँकेचे काम”
पीएलडी बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. संचालक मंडळातील सर्व सदस्य विविध राजकीय विचारांचे असले तरी बँकेच्या कामकाजात राजकारण न आणता शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जात असल्याचे चेअरमन पाटील यांनी सांगितले.
“मी गेल्या १७ वर्षांपासून बँकेच्या कामकाजाशी संबंधित आहे. आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याकडून वैयक्तिक लाभ घेतलेला नाही. शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठीच संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
घाडी यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना पाटील यांनी हे आरोप राजकीय आकसातून करण्यात आले असल्याचा दावा केला. तसेच बँकेच्या कामकाजासंदर्भात कोणाला काही शंका असल्यास त्या वार्षिक सभेत उपस्थित करून त्यावर चर्चा करता येईल, असेही त्यांनी स्पस्ट केले.