खानापूर : रासायनिक खते अधिक चढ्या दराने विक्री करणाऱ्या सहकारी संस्था व खाजगी खत विक्रेत्यावर कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवली आहे. मंगळवारी कृषी खात्याचे सहाय्यक निर्देशक डी. बी. चव्हान यांनी खानापूर तालुक्यातील अनेक रासायनिक खत विक्री दुकानांना भेटी देऊन अधिक दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदारावर व सहकारी संस्थांच्या प्रतिनिधीवर दंडात्मक कारवाई केली आहे. नंदगड येथील मार्केटिंग सोसायटी मध्ये व्यवस्थापक भूषण पाटील हे अधिक दराने युरिया तसेच 10. 26. 26 हे रासायनिक खत विकत असल्याचे पावती निशी अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आले. त्यामुळे त्यांनी नंदगड मार्केटिंग सोसायटीवर जाऊन गोडाऊन मधील खत साठ्याची पाहाणी केली. व विक्रीतील तफावती संदर्भात सदर व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस लावून उत्तरही तोपर्यंत रासायनिक खत विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत. खानापूर तालुक्यात अनेक सहकारी पतसंस्था तसेच मार्केटिंग सोसायटीच्या मार्फत रासायनिक खत विक्रीचे परवाने आहेत. शिवाय खाजगी खत विक्रीचे परवाने असणारे दुकानदाराही मोठ्या प्रमाणात आहेत. पण अनेक दुकानांमधून रासायनिक खताची विक्री चढ्या भावाने होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेता कृषी सहाय्यक निर्देशक यांनीही कारवाई केली आहे. दिवसभरात तालुक्यातील अनेक परवानाधारक दुकाने तसेच सहकारी संस्थांच्या ठिकाणी जाऊन गोदामातील साठ्याची व विक्री संदर्भात चौकशी केली अधिकाऱ्यांच्या या कारवाई बद्दल शेतकरी वर्गातून समाधान होत आहे.