
जांबोटी (फोटो)- मोर्चा संदर्भात पत्रके वाटून जागृती करताना खानापूर तालुका म ए समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई ,सरचिटणीस आबासाहेब दळवी, जयराम देसाई, मारुती परमेकर, पांडुरंग नाईक, व इतर
जांबोटी :
कर्नाटक सरकारने बेळगाव सह संपूर्ण सीमा भागात सक्तीने कन्नड सक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे यामुळे मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडी बरोबर मराठी मधून ही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावित, तसेच सक्तीचे कानडीकरण थांबवावे या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी मराठी भाषिकांचा बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मराठी भाषिकानी सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी, यासाठी मंगळवारी खानापूर तालुका म ए समितीच्या वतीने जांबोटी येथे जागृती फेरीचे आयोजन करून, पत्रकांचे वाटप करण्यात आले, मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार, जांबोटी भागातील नागरिकांमधून व्यक्त करण्यात आला.
बेळगाव सह मराठी भाषिक बहुभाग 1956 सालापासून अन्यायाने कर्नाटकामध्ये डा बण्यात आला आहे. 15 टक्के पेक्षा जास्त संख्या असलेल्या, भाषिक अल्पसंख्यांकना त्यांच्या मातृभाषेतून सरकारी परिपत्रके उपलब्ध करून देण्याचा कायदा असला तरी कर्नाटक सरकार सीमा भागात सक्तीने कन्नड सक्ती राबवित असल्यामुळे, मराठी भाषा व संस्कृतीवर अन्याय होत आहे. त्यामुळे ही कन्नड सक्ती त्वरित थांबवून, मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतून व्यवहार करता यावा यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा असे आव्हान म ए समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन करण्यात आले .
या जागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म ए समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, म ए समितीचे नेते राजाराम देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर ,माजी ता प सदस्य पांडुरंग नाईक, मध्यवर्ती म ए समिती सदस्य वसंत नावलकर ,रवींद्र शिंदे, बाबुराव भरनकर, राजू चिखलकर, विठ्ठल देसाई, रवींद्र देसाई , हणमंत जगताप,चंद्रकांत बैलूरकर, यांच्यासह बहुसंख्य मराठी भाषिक सहभागी झाले होते.