खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गणे बैल नजीकचा टोल प्लाझा हा वाहनधारकांच्या बाबतीत अन्यायकारक ठरत आहे. एकीकडे रस्ता पूर्ण नाही दुसरीकडे नुकसान भरपाई नाही. अशातच टोल प्लाझा वर जाचक नियम लावून वाहनधारकांची होणारी लूट तातडीने थांबवावी. रस्ता पूर्ण झाल्यानंतरच टोल आकारणीला प्रारंभ करण्यात यावा. शिवाय टोलच्या परिसरातील 20 किलोमीटर अंतरावरील वाहनधारकांना मोफत प्रवेश देण्याची सोय टोल व्यवस्थापकांनी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज गुरुवारी गणेबैल टोल प्लाजावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात करण्यात आला.
शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते गोपाळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कुंभार, इदलहोंड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर उपाध्यक्ष पाटील सहगर्लगुंजी इदलहोंड , निटूर, प्रभु नगर, हत्तरगुंजी खेमेवाडी सह गणेबैल परिसरातील शेकडो नागरिक व विविध राजकीय मंडळीनी पाठिंबा दर्शवला होता.
यावेळी बोलताना शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी टोल प्लाजा व्यवस्थापकावर कडाडून आक्षेप घेतला. टोल वसुली ही केवळ एक टोळधाड आहे. फास्टट्रॅक च्या खात्यावर रक्कम नाही म्हणून त्या वाहनाला अडवणे हे चुकीचे आहे.मासिक पास असतानाही अडचण आणणे हे चुकीचे आहे. शिवाय सद्य परिस्थितीत बेळगाव -पणजी या अनमोड रस्त्याचे काम अर्धवट असताना त्या ठिकाणी टोल सुरू करून एक प्रकारे खानापूर तालुक्यातील जनतेची लूट करण्याचा हा प्रकार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना नुकसान भरपाई नाही. नियमाप्रमाणे टोलच्या परिसरातील किमान 20 किलोमीटर रहिवासी असणाऱ्या टोलधारकांना टोल माफी असे अनेक धोरणे आहेत. मात्र याची कोणतीच अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे या विरोधात न्यायालयीन लढा उभारून आपण दाद मागणार येत्या १५ दिवसात या मागण्यांची समस्या पूर्ण झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.