खानापूर/ प्रतिनिधी:
तालुका सरकारी रुग्णालय आणि बस स्थानकावर मराठीतून फलक लावावेत अन्यथा उद्घाटनाच्या वेळी निदर्शने करुन झेंडे दाखविण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला आहे. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.
यावेळी देसाई यांनी बसस्थानक आणि तालुका सरकारी रुग्णालयात मराठी भाषेतून फलक लावावेत. यासाठी निवेदन देऊन सातत्याने मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही मराठीतून मुख्य ठिकाणी फलक लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे वेळेत फलक न लावल्यास निषेध नोंदविला जाईल अशी माहिती दिली. तसेच या आंदोलनात मराठी भाषिकांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. .
तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र सरकारकडे केलेल्या विविध मागण्या वेळेत पूर्ण कराव्यात अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला खानापूर तालुका समितीच्या वतीने पाठिंबा व्यक्त केला.
माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास बेळगावकर यांनी मराठी भाषिकांच्या विविध समस्यांबरोबरच खानापूर येथील तहसीलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. कोणत्याही प्रकारचे काम करून घ्यायचे असल्यास चिरमिरी दिल्याशिवाय काम होत नाही त्यामुळे अनेकांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे येथील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गेल्या अनेक वर्षांपासून खानापूर तालुक्यात ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांची बदली करावी यासाठी निवेदन द्यावे अशी सूचना केली.
मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी रणजीत पाटील यांनी येणाऱ्या काळात तालुक्यातील विविध समस्यांबाबत आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे तरच प्रशासनाला जाग येणार आहे अन्यथा समस्या वाढत जाणार आहेत त्यामुळे सर्वांनी प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले.
मध्यवर्ती समितीचे सदस्य मारुती परमेकर, गोपाळ पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य पांडुरंग सावंत, उपाध्यक्ष रमेश धबाले यांनी समितीच्या बळकटीसाठी येणाऱ्या काळात अधिक चांगल्या प्रकारे संघटना बळकट करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी खजिनदार संजीव पाटील, बळीराम देसाई, शिवाजी पाटील, पुंडलिक पाटील, नाना घाडी, विलास देसाई, रामचंद्र गावकर, विवेकानंद पाटील, किरण पाटील, नारायण पाटील, बी बी पाटील, मोहन गुरव आधी कार्यकर्ते उपस्थित होते.
…
चौकट
तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन फलक न लावल्यास आंदोलन केले जाणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर आमदार हलगेकर यांनी फलक लावण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केली जाईल असे आश्वासन दिले आहे तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत देखील चर्चा करीत रस्त्यांची लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. मात्र अद्यापही मराठीतून मुख्य ठिकाणी फलक लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे वेळेत फलक न लावल्यास निषेध नोंदविला जाईल अशी माहिती दिली.
.
.