खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
बेळगाव – पणजी व्हाया चोरला या राज्य मार्गावर अवजड वाहने पुन्हा सुरूच आहेत. त्यामुळे या अवजड वाहनामुळे या मार्गाची वाताहत झाली आहे. या मार्गावर अवजड वाहनांना बंदी असताना देखील पोलिसांच्या आशीर्वादाने चोरट्या मार्गाने अवजड वाहने जोरात ये जा करत आहेत. येथील शंकर पेट चढावाजवळ एक अवजड ट्रक अडकल्याने बुधवारी सकाळपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्याच्या एका कडेला सदर अवजड ट्रक अडकल्याने दुसऱ्या मोठ्या वाहनांना जाण्या येण्यासाठी जागा नसल्याने शाळकरी मुलांचे सकाळी चांगलेच हाल झाले. रस्ता नसल्याने बस वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा हा प्रश्न पुन्हा पुन्हा चर्चेत येताना दिसतो आहे.
कुसमळी नजीकच्या पुलावर धोका निर्माण झाल्याने पावसाळ्यात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी प्रत्यक्ष पाहणी करून या मार्गावरील वाहतूक बंद केली होती. त्यामुळे जांबोटी कणकुंबी भागातील नागरिकांना या अवजड वाहनामुळे सुटका मिळणार अशी आशा असतानाच पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर ठेवून या रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरूच आहे. कुसमळी मार्गावरून होणाऱ्या वाहतूक वर काही वेळा निर्बंध घालण्यात असल्याने अनेक अवजड वाहनधारक जांबोटी खानापूर मार्गे अवजड वाहतूक वाढली आहे. अशातच बुधवारी पहाटेच्या सुमारास गोव्या हून खानापूरच्या दिशेने येणारा एक अवजड ट्रक अडकल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बंद झाली आहे. रस्त्याची झालेली चाळण त्यात अवजड वाहने यामुळे दुचकी धारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रशासनाच्या आंधळेपणाच्या वृत्ती बद्दल या भागातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.