खानापुरात स्वरक्षण कराटे अकादमीच्या कराटेपटूंचे यश
फोटो : खानापूर : यश मिळवलेल्या कराटेपटूंचा सत्कार करताना वासुदेव चौगुले, नारायण गुरव, प्रवीण अगनोजी, मारुती गावडे, लक्ष्मण नाईक व इतर.
खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी
- गाव, तालुका ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांमुळे सर्वच खेळांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. खेळातून करिअरच्या अनेक संधीही उपलब्ध झाल्या आहेत. परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात समर्पित भावनेने झोकून दिल्यास यशाला गवसणी घालता येते. जो समाज खेळांना महत्त्व देतो तेथे सन्मान आणि देशाभिमान दोन्ही हातात हात घालून दिसून येतात. असे प्रतिपादन पत्रकार वासुदेव चौगुले यांनी केले.
- शहरातील रवळनाथ मंदिरात स्वरक्षण कराटे अकादमीच्या कराटेपटूंच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक नारायण गुरव होते.
- ते म्हणाले, कराटे या खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी तालुक्यातील पहिली संस्था साकार झाल्याने या कलेची आवड जोपासणाऱ्या विद्यार्थी, युवती आणि खेळाडूंची सोय झाली आहे. कराटे ही शक्ती बरोबरच युक्तीचे महत्त्व सांगणारी कला आहे. ही कला युवती आणि महिलांना स्वतःच्या रक्षणासाठी समर्थ बनविते. ती आत्मसात करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. शिरगुपी कागवाड येथे नुकताच संपन्न झालेल्या तिसऱ्या ऑल इंडिया कराटे चॅम्पियन स्पर्धेत तसेच इदलहोंड येथे पार पडलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत स्वरक्षण कराटे अकादमीच्या दहा कराटेपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत यश संपादन केले. त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अकादमीचे प्रशिक्षक लक्ष्मण नाईक यांनी, तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये कराटे शिकण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. त्यांना केवळ योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. वर्षभराचे प्रशिक्षण या विद्यार्थ्यांनी केवळ सहा महिन्यातच पूर्ण केले आहे. जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरील स्पर्धेसाठी या कराटेपटूंची आपण उत्तम तयारी करून घेत असल्याचे सांगितले.
- प्रमुख पाहुणे म्हणून हलकर्णी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष प्रवीण अगनोजी, लोकसेवा पतसंस्थेचे संचालक मारुती गावडे, सदाशिव माविनकोप आदी उपस्थित होते.