खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
मराठा मंडळ बेळगांव संचलित खानापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एनसीसी विभागाने वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बिडी येथील सरकारी पदवी महाविद्यालयाचे प्रा. सी. व्ही. पाटील उपस्थीत होते.
वृक्षारोपण प्रसंगी बोलताना म्हणाले की, आम्ही तुकोबांचे पाईक त्यामुळे वृक्ष वल्ली आम्हाला सोयरे लागतात.. सध्या पर्यावरणाचा होणारा ऱ्हास भविष्यातील मानवी वसाहतीस पूरक नाही.. जर आपण वेळेत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला नाही तर उद्याची पिढी आम्हास माफ करणार नाही. त्यामुळे एनसीसी छात्रांचा पर्यावरण संवर्धनाचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केलेला हा संकल्प नक्कीच अभिनंदनीय आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्या प्रा. जे. बी. अंची होत्या.
यावेळी बोलताना प्राचार्या जे बी अंची म्हणाल्या आम्ही विकसित भारताची उभारणी करीत आहोत. या उभारणीत पर्यावरणाचा समतोल राखण्याचे नवे आव्हान आज देशावर येऊन ठेपले आहे. त्यामूळे तरुण पिढीचे या कार्यात योगदान अत्यावश्यक आहे. एनसीसी छात्र आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक जण एक झाड लावून एक वेगळा संदेश समाजाला देत आहेत..असे बोलताना त्यांनी उद्गार काढले..
कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. आय. एम. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कपिल गुरव यांनी केले तर आभार कु. मसनू गावडे याने व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालाचा प्राध्यापक वर्ग विद्यार्थी वर्ग बहु संख्येने उपस्थित होता.