खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी:
- खानापूर तालुक्याच्या ठिकाणी येत्या 12 जुलै रोजी लोकार्पण होत असलेल्या नूतन बस स्थानक तथा माता आणि शिशु हॉस्पिटल इमारतीचा उद्घाटन समारंभ होऊ घातला आहे. मात्र या शासकीय इमारतीवर केवळ कन्नडमध्ये नाम फलक लावण्यात आला आहे. यासाठी कन्नड बरोबर मराठीतही ते नाम फलक लावण्यात यावा अशी मागणी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केली आहे.
- खानापूर बस स्थानकाची नवीन इमारत,नव्याने बांधण्यात आलेली तालुका आरोग्य इमारत व नूतन हेस्कॉम कार्यालय यावर इतर भाषेबरोबर मराठीतही फलक लावा, यासाठी सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मागणी केली, तसेच आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांना भेटून व कारवार लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री विश्वेश्वर कागेरी हेगडे यांना फोनवर चर्चा करून उपरोक्त मागणी करून विनंती वजा इशारा देण्यात आला.
- यावेळी माजी सभापती सुरेश देसाई,पी.एच. पाटील,रवी पाटील,राजू पाटील,भूपाल पाटील व इतर उपस्थित होते.
- कन्नड बरोबर मराठीसाठी आमचाही प्रयत्न; आमदार विठ्ठल हलगेकर. यावेळी सदर शिष्टमंडळाला आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कन्नड बरोबर मराठीत नाम फलक लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पत्र दिले आहे. यासाठी आमचाही प्रयत्न सुरू असून शिवाय खासदार विश्वेश्वर हेगडे कागिरे यांनी यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली असल्याचे त्यांनी सांगितले.