खानापूर : उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर चातकाप्रमाणे ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात, तो मान्सून रविवारी (दि. 19) अंदमानात दाखल झाला आहे. 31 मे रोजी त्याचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली . दिलासादायक बाब म्हणजे यंदा मान्सून धो-धो बरणार असून, सुमारे 106 टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरवर्षी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला 4 दिवस कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 28 में ते 3 जूनदरम्यान मान्सून भारताच्या मुख्यभूमीत दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांवर शिरकाव करतो. दरवर्षी 21 मे रोजी या बेटांवर मान्सून येत असतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मात्र 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर तो धडकणार आहे. गेल्यावर्षी अंदमानला तो 19 मे रोजी आला होता. मात्र, केरळमध्ये 9 दिवस उशिराने म्हणजे 8 जूनला पोहोचला. यंदा त्यात काही बदल होतो का, त्यावर मान्सूनचा देशातील पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे.
‘ला निना’मुळे काय होणार? गेल्या वर्षी ‘अल निनों’ सक्रिय होता, तर यंदा तो संपुष्टात येत आहे. त्यामुळे तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी ‘अल निनों’दरम्यान सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला, यंदा मात्र ‘ला निना’मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ला निना असेल तर चांगला पाऊस होतो, असे आतापर्यंतचा इतिहास आहे.
महाराष्ट्रात कधी येणार?
केरळमध्ये मान्सून आल्याची चर्चा होत असताना तो महाराष्ट्रात कधी येणार? याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे. गेल्या वर्षी मान्सूनला महाराष्ट्रात येण्यास बराच उशीर झाला होता. त्यामुळे यंदाही तसेच होणार की वेळेवर येणार? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून 11 जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.