- खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी: सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
- खानापूर येथील शिवस्मारक येथे शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यासाठी विद्यापिठातील प्राध्यापकांतर्फे मंगळवारी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवाजी विद्यापीठातर्फे लागू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचा सीमाभागातील विद्यार्थ्याना लाभ व्हावा यासाठी विद्यापीठाच्या कमिटीतर्फे माहिती देण्यात आली.
- प्रारंभी तालुका समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी प्रास्तविक करताना शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेली योजना मराठी भाषिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी गावागावात जाऊन माहिती दिली जाईल असे सांगितले.
- प्रा.कविता वड्राळे यांनी २०२३ पासून शिवाजी विद्यापीठातर्फे योजना लागू करण्यात आली आहे. त्याचा पहिल्या वर्षी ४४ विद्यार्थी, दुसऱ्या वर्षी 87 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तर यावर्षी आता पर्यंत सीमाभागातून १०० अर्ज दाखल झाले आहेत. विविध अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीची राहण्याची मोफत सोय करण्यात आली आहे तसेच सीमाभागातील विद्यार्थ्यासाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ८६५ गावातील असला पाहिजे तसेच १५ वर्षे गावात वास्तव्य केलेला दाखला असणे आवश्यक आहे. तसेच ज्या अभ्यासक्रमांसाठी पूर्व परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्यामुळे अनेकांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते मात्र शिवाजी विद्यापीठातील योजनेमुळे सीमा भागातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील अभ्यासक्रमाबाबत माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ संतोष सुतार, डॉ नवनाथ वलेकर, डॉ जगन कराडे आदी उपस्थित होते.
- यावेळी युनिव्हर्सिटीचे समन्वयक डॉ. जगन कराडे, डॉ. उदय पाटील, डॉ. संतोष सुतार, डॉ. नवनाथ वलेकर, डॉ. कविता वड्राले यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
- तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, मध्यवर्ती समितीचे सदस्य गोपाळ देसाई, पांडुरंग सावंत, अभिजीत सरदेसाई, मिलिंद देसाई, धनेश देसाई संजीव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी खानापूर तालुक्यातील विविध भागातील विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.