खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- भारत स्वातंत्र्यानंतर देशाला तारणारा खरा पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. या पक्षाने मागील 60 वर्षात तात्कालीन आर्थिक परिस्थिती व जागतिक आणीबाणीच्या काळात देशाला तारण्याचे काम केले आहे. सावकार शाहीच्या विळख्यात अडकलेल्या देशातील शेतकऱ्यांना बाहेर काढून कुळ कायद्यांतर्गत अनेक शेतकऱ्यांना मालकीच्या हक्काच्या जमिनी देण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले. असे असताना काँग्रेसने काय केले असे म्हणणाऱ्यांना शेतकऱ्यांची किंमत काय कळणार, अलीकडच्या बदलत्या राजकीय बदल होत गेले. मात्र जुन्या पिढीतील लोक आजही काँग्रेसला ओळखून आहेत. आज देशभरात हुकूमशाही सारखे राज सुरू असून अशा हुकूम शाहीला मोडीत करण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासह नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज आहे. आज उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने खानापूर तालुक्याच्या विकासाचा तथा या भागातील परिस्थितीची जाणीव लक्षात घेता एक सुज्ञ व सुशिक्षित माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना उमेदवारी देऊन या तालुक्याचा मान राखला आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून केवळ खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या पाठीशी खानापूर तालुक्यातील नागरिकांनी उभे राहणे गरजेचे आहे. प्रामुख्याने मराठा समाजाला दिलेले प्रतिनिधित्व हे या भागाच्या विकासाचे एक प्रतीक असून आपण जात भेद पक्ष भेदभाव बाजूला ठेवून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे व लोकसभेत आपल्या खानापूरचा लोकप्रतिनिधी पाठवून देण्यासाठी सर्वांनी शपथ घ्यावी असे आवाहन जांबोटीतील सामाजिक कार्यकर्ते गणपती कोटीभास्कर यांनी जांबोटी येथे जिल्हा पंचायत विभागीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर उत्तर कन्नड लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर याबरोबर या भागातील सामाजिक कार्यकर्ते पक्ष कार्यकर्ते व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.