- खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी:
- मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे किंवा ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात शिकल्यामुळे आपण कुठे कमी पडतो अशी काही विद्यार्थ्यांना मनात खंत असते, परंतु विद्यार्थ्यांनी न डळमळता आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जीवनात यश संपादन केलं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांमध्ये कोणती ना कोणती कला असते किंवा कौशल्य दडलेले असते ते बाहेर काढले पाहिजे, त्याला वाव देण्याची गरज आहे. आपण जर सातत्य, प्रयत्न आणि परिश्रम करण्याची तयारी तयारी ठेवली तर कोणतेही यश सहज मिळू शकते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून जिद्द आणि चिकाटी ठेवून यशस्वी होण्यासाठी धडपड केली पाहिजेत असे मत भारतीय सीमा सुरक्षा दलाचे सेवानिवृत्त डीआयजी अशोक पाटील यांनी व्यक्त केले.
- सेवानिवृत्त डीआयजी अशोक पाटील हे कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व विश्व भारत सेवा समितीचे संस्थापक गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी होते.
- प्रारंभी ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या फोटोचे पूजन करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. विद्यार्थिनींच्या इशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस जी चीगुळकर यांनी प्रास्ताविक भाषणात विश्व भारत सेवा समितीने जांबोटी कणकुंबी भागात पन्नास साठ वर्षांपूर्वी केलेल्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.श्री माउली विद्यालयात सुरुवातीच्या काळात विना मोबदला काम केलेले तत्कालीन शिक्षक आर ए. मोदगेकर व एल व्ही शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक एस आर अवताडे ,एसडीएमसी अध्यक्ष उमेश गावडे, कणकुंबी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौ दीप्ती दिलीप गवस व उपाध्यक्षा सौ नीलिमा भिकाजी महाले,पारवाड ग्रामपंचायतीचे अध्यक्ष भिकाजी अर्जुन गावडे,उपाध्यक्ष सौ सिता रामा सुतार व शाळेतील चित्रकला शिक्षक कै.ए.बी कुंदप यांचे चिरंजीव आदर्श कुंदप आदी मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
* डी.आय.जी अशोक पाटील यांचा सत्कार *
- कणकुंबी जांबोटी भागातील चिखले गावचे सुपुत्र अशोक अर्जुन पाटील यांनी भारतीय सीमा सुरक्षा दलात बेंगलोर येथे डीआयजी म्हणून पाच वर्षे सेवा बजावली.डीआयजी पदापर्यंत पोहोचणारे खानापूर तालुक्यातील पहिले सुपुत्र.सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सेवेतून ते नुकतेच निवृत्त झाले. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचाही शाल श्रीफळ व सलमान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, सत्कारमूर्ती एल.व्ही.शिंदे,आर ए.मोदगेकर,एस.आर.अवताडे यांची भाषणे झाली.याप्रसंगी निवृत्त प्राचार्य सुरेंद्र देसाई,माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश नाईक, परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी यांनी केले.