नवी दिल्ली: सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना सोमवार, २२ जानेवारीला अर्धा दिवस सुटी घोषित करण्यात आली आहे. अयोध्येच्या भव्य राम मंदिरातील ‘प्राणप्रतिष्ठा’ सोहळा पाहता यावा, यासाठी ही सुटी देण्यात आली असून २२ जानेवारीला त्यांना दुपारी अडीच वाजेपर्यंत कार्यालयात पोहचावे लागणार आहे, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे केंद्रीय गृह विभागाने निवेदनातं स्पष्ट केले आहे. अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच घरोघरीही पूजा-अर्चा केली जाणार आहे, या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याच्या उद्देशाने सुटी जाहीर करण्यात आली आहे.